Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाटा समूहाची संपत्ती पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे, कारण...

टाटा समूहाची संपत्ती पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे, कारण...
-मिर्झा एबी बेग
माझ्या लहानपणी हिंदीतली एक म्हण कायम प्रत्येकाच्या तोंडात असायची, ती म्हणजे 'जूतों में बाटा और सामान में टाटा बहुत मज़बूत होते हैं.'
 
यात कितपत तथ्य होतं हे तेव्हा माहिती नव्हतं. पण आजच्या बातम्या पाहिल्या तर असं दिसतंय की, टाटा ग्रुप ऑफ कंपनीजची एकूण संपत्ती 365 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
 
यामुळे ती केवळ भारतातील सर्वांत मोठी कंपनी ठरते असं नाही तर या कंपनीच्या संपत्तीची तुलना करायची झाल्यास पाकिस्तानच्या सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा ही (जीडीपी) ती जास्त आहे.
 
बऱ्याचदा आपल्या कानावर पडतं की रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनलेत किंवा मग अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी त्यांना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकलंय. पण टाटांच्या नावाची चर्चा आपल्याला ऐकायला मिळत नाही, असं का बरं?
 
चहापासून ते जग्वार, लँड रोव्हर या गाड्यांपर्यंत आणि मीठ बनवण्यापासून ते विमाने, हॉटेल्सचा चालवण्यापर्यंत विविध क्षेत्रात टाटांचा प्रभाव दिसून येतो.
 
या वर्षी फेब्रुवारीमध्ये टाटा समूहाचं बाजार भांडवल अंदाजे 365 अब्ज डॉलर इतकं होतं. तर अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानचा जीडीपी अंदाजे 341 अब्ज डॉलर असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
 
जर आपण फक्त टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसबद्दल बोललो तर त्याची मालमत्ता 170 अब्ज यूएस डॉलर्स इतकी आहे. आणि भारतातील दुसरी सर्वांत मोठी कंपनी आहे. या सर्व्हिसेसची संपत्ती पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास निम्मी आहे.
 
टाटा कंपनीची स्थापना
पण हे सगळं एकाच दिवसात उभं राहिलेलं नाही. यासाठी 150 वर्षांपेक्षाही जास्त काळ लागला. पण भारताच्या औद्योगिक क्षेत्रात ही कंपनी कायम आघडीवर राहिली आहे.
 
8 फेब्रुवारी 1911 रोजी लोणावळ्यातील धरणाची पायाभरणी करताना टाटा समूहाचे प्रमुख सर दोराबजी टाटा यांनी त्यांचे वडील जमशेदजी टाटा यांच्या ध्येयधोरणाबाबत सांगितलं होतं.
 
1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी टाटा कंपनीची पायाभरणी केली होती.
 
आज या समूहाने एकूण 30 कंपन्यांचा डोलारा उभा केलाय. सहा खंडांमधील शंभरहून अधिक देशांमध्ये टाटा आपली सेवा देत आहे.
 
सर दोराबजी टाटा म्हणाले होते, "माझ्या वडिलांसाठी संपत्ती जमा करणं ही प्राथमिकता नव्हती. त्यांनी या देशातील लोकांची औद्योगिक आणि वैचारिक स्थिती सुधारण्यास प्राधान्य दिलं. त्यांनी आपल्या आयुष्यात ज्या विविध संस्था उभ्या केल्या त्यांचा मुख्य उद्देश होता या महत्त्वाच्या क्षेत्रांचा विकास करणं."
 
कंपनीच्या वेबसाइटवर आपली उद्दिष्ट नमूद करताना त्यांनी म्हटलंय की, कंपन्यांची स्थापना जगभरातील विविध समुदायांचं जीवनमान सुधारण्यासाठी करण्यात आली आहे.
 
असं म्हणतात की, एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी टाटाचे संस्थापक जमशेदजी टाटा मुंबईतील एका महागड्या हॉटेलमध्ये गेले होते. पण त्यांच्या रंगरूपामुळे त्यांना आतमध्ये जाण्यापासून रोखलं.
 
या घटनेचा जमशेदजींच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांनी ठरवलं की या हॉटेलपेक्षाही चांगलं असं हॉटेल बांधू, जिथे सर्व भारतीय नागरिकांना ये-जा करण्याची मुभा असेल.
 
पहिलं लक्झरी हॉटेल
अशा प्रकारे 1903 मध्ये मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर ताज हॉटेल उभं राहिलं. शहरातील ही पहिली अशी इमारत होती ज्यामध्ये वीज, अमेरिकन पंखे, जर्मन लिफ्ट अशा सुविधा देण्यात आल्या होत्या.
 
इथे इंग्रज स्वयंपाकी काम करायचे. आज अमेरिका आणि ब्रिटनसह नऊ देशांमध्ये त्याच्या शाखा आहेत.
 
जमशेदजींचा जन्म 1839 मध्ये एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वज पारशी धर्मगुरू होते.
 
त्यांनी कापूस, चहा, तांबे, पितळ आणि अफू (त्या काळी याचा व्यापार बेकायदेशीर नव्हता) यातून भरपूर पैसा कमावला.
 
त्यांना जगभर प्रवास करायला, विविध देशांना भेटी द्यायला आवडत होतं. या देशातील नवीन शोधांमुळे ते खूप प्रभावित झाले.
 
ब्रिटनच्या भेटीदरम्यान लँकशायरमधील कापूस गिरण्या पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, भारत देखील आपल्या वसाहती देशाशी स्पर्धा करू शकतो.
 
पहिली कापड गिरणी
आणि यातूनच त्यांनी 1877 महाराणी मिल या नावाने देशातील पहिली कापड गिरणी सुरू केली. महाराणी मिल्सचं उद्घाटन त्या दिवशी झालं ज्या दिवशी राणी व्हिक्टोरियाचा भारताची सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक झाला.
 
जमशेदजींची भारताच्या विकासाची दृष्टी स्वदेशी या शब्दावरून समजून येते. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी हा एक महत्त्वाचा भाग होता.
 
ते म्हणाले होते, "समाजाच्या विकासासाठी सर्वांत कमकुवत आणि असहाय्य लोकांना आधार देण्याऐवजी, सर्वात सक्षम आणि प्रतिभावान लोकांना मदत करणं महत्त्वाचं आहे जेणेकरून ते त्यांच्या देशाची सेवा करू शकतील."
 
पहिलं औद्योगिक शहर
त्यांचं सर्वांत मोठं स्वप्न होतं ते म्हणजे भारतात पोलाद कारखाना उभारण्याचं. पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांचे निधन झालं.
 
त्यानंतर त्यांचा मुलगा दोराबजी यांनी वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांचं स्वप्न पूर्ण करत 1907 मध्ये टाटा स्टीलची स्थापना केली. अशा प्रकारे पोलाद कारखाना असलेला भारत हा आशियातील पहिला देश बनला.
 
या कारखान्याजवळ एक शहर वसविण्यात आलं.
 
जमशेदपूर असं नामकरण केलेल्या या शहराला भारताची स्टील सिटी म्हणून ओळखलं जातं.
 
जमशेदजींनी आपल्या मुलाला, दोराब याला पत्र लिहून औद्योगिक शहराची स्थापना करण्यास सांगितलं होतं. त्यांनी यात लिहिलं होतं की, "या शहरातील रस्ते रुंद असावेत. झाडं, क्रीडांगण, उद्याने, धार्मिक स्थळांसाठी जागा राखीव असावी."
 
कोणत्याही कायदेशीर निर्बंधांशिवाय टाटा यांनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी काही धोरणं आखली.
 
यात 1877 मध्ये पेन्शन, 1912 मध्ये कामाचे आठ तास, 1921 मध्ये माता झालेल्या महिलांसाठी सूट अशा कल्याणकारी योजनांचा समावेश होता.
 
पहिली हवाई सेवा
टाटा कुटुंबातील आणखी एक सदस्य जहांगीर टाटा यांनी 1938 मध्ये वयाच्या 34 व्या वर्षी कंपनीचा कारभार हाती घेतला. ते जवळपास 50 वर्षं कंपनीचे अध्यक्ष होते.
 
उद्योगपती होण्यापेक्षा त्यांना वैमानिक बनण्यात जास्त रस होता. इंग्लिश चॅनेलवर उड्डाण करणारे पहिले वैमानिक लुई ब्लेराइटला भेटल्यानंतर त्यांची ही इच्छा आणखीन तीव्र झाली.
 
बॉम्बे फ्लाइंग क्लबमधून वैमानिकाचं प्रशिक्षण घेणारे जेआरडी भारतातील पहिले व्यक्ती होते. आणि एअर लायसन्स मिळवणारेही पाहिले व्यक्ती होते. याचा त्यांना खूप अभिमान होता.
 
त्यांनी भारतातील पहिली हवाई टपाल सेवा सुरू केली. या विमानातून टपाल आणि सोबत प्रवाशांनाही नेलं जायचं.
 
त्यानंतर ही टपाल सेवा भारतातील पहिली विमान कंपनी 'टाटा एअरलाइन्स' बनली. पुढे तिचं नाव बदलून 'एअर इंडिया' असं करण्यात आलं.
 
त्या काळात 'एअर इंडिया' सरकारी मालकीची झाली असली तरी भारत सरकरने जेव्हा ही कंपनी विकायला काढली तेव्हा पुन्हा एकदा टाटांनी ही कंपनी विकत घेतली. एअर इंडिया विकत घेतल्यानंतर आज टाटा सन्सकडे तीन एअरलाईन्स आहेत.
 
एअर इंडिया व्यतिरिक्त त्यांच्याकडे 'एअर विस्तारा' आणि 'एअर एशिया' अशा दोन एअरलाइन्स आहेत. यांची अनुक्रमे सिंगापूर एअरलाइन्स आणि एअर मलेशियाशी भागीदारी आहे.
 
एअर इंडियाची मालकी परत मिळवल्यावर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये असं म्हटलं होतं की, हा एक 'ऐतिहासिक क्षण' आहे. आणि देशातील प्रमुख एअरलाइन्सची मालकी मिळवणं ही अभिमानाची गोष्ट आहे.
 
चंद्रशेखर यांनी पुढे म्हटलं होतं की, "भारताला अभिमान वाटेल अशी आंतरराष्ट्रीय विमानसेवा चालवण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराजाचं (एअर इंडियाचा लोगो) परत येणं ही जेआरडी टाटांसाठी खरी श्रद्धांजली असेल."
 
संगणकाच्या जगात पाऊल
यापूर्वी भारत सरकारने टाटा समूहाचे प्रमुख जेआरडी टाटा यांना एअर इंडियाचं अध्यक्ष केलं होतं आणि 1978 पर्यंत ते या पदावर होते. पुढे भारत सरकारचे अधिकारी या पदावर नियुक्त केले जाऊ लागले.
 
1968 मध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाची परंपरा चालू ठेवत एका नव्या व्यवसायाची पायाभरणी केली. हा असा उद्योग होता जो केवळ विकसित देशांमध्ये सुरू होता. हा व्यवसाय संगणकाशी संबंधित होता.
 
'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' किंवा 'टीसीएस' नावाची ही कंपनी जगभरात सॉफ्टवेअरचा पुरवठा करते. सध्या ती टाटा समूहातील मोठा नफा कमावणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.
 
1991 मध्ये त्यांचे दूरचे नातेवाईक, रतन टाटा यांनी कंपनीची सूत्र हाती घेतली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली टाटांनी जगभर आपला व्यवसाय विस्तारला.
 
टाटाने टेटली टी, एआयजी इन्शुरन्स कंपनी, बोस्टनमधील रिट्झ कार्लटन, दाएवू हेवी व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि कोरस स्टील युरोप यांसारख्या कंपन्या खरेदी केल्या.
 
आजची टाटा कंपनी आणि त्यांच्या यशाचं रहस्य
टाटा सन्स ही मूळ गुंतवणूक होल्डिंग कंपनी आणि टाटा कंपन्यांची प्रवर्तक आहे. टाटा सन्सच्या इक्विटी शेअर कॅपिटलपैकी 66 टक्के भाग परोपकारी लोकांच्या मालकीचा आहे. ज्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, कला आणि संस्कृती या क्षेत्रांत योगदान दिलं आहे.
 
आम्ही टाटा कंपनी कॉर्पोरेट कम्युनिकेशनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
 
टाटा कंपनीने अद्याप कंपनीच्या संपत्तीचे आकडे उघड केले नसले तरी 31 जुलै 2023 पर्यंत त्यांनी त्यांची संपत्ती 300 अब्ज डॉलर असल्याचं घोषित केलं होतं. शिवाय कंपनीमध्ये जगभरातील 10 लाखांहून अधिक कर्मचारी काम करत असल्याचंही सांगितलं होतं.
 
कंपनीच्या मते, टाटा कंपनी किंवा एंटरप्राइझ त्यांच्या संबंधित संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली आणि देखरेखीखाली स्वतंत्रपणे काम करते.
 
टाटांच्या जबरदस्त यशाविषयी जेव्हा आम्ही अर्थतज्ज्ञ शंकर अय्यर यांच्याशी चर्चा केली तेव्हा ते म्हणाले, "अंबानी किंवा अदानी यांची नावं येतात कारण त्यांच्या कंपन्या वैयक्तिक आहेत, तर टाटा हा वेगवेगळ्या कंपन्यांचा समूह आहे आणि हा समूह एका ट्रस्टच्या अंतर्गत चालवला जातो. त्यामुळे त्यांची तितकी चर्चा होत नाही."
 
फोनवर बोलताना ते म्हणाले की, कॉर्पोरेट जगतात अशा तुलना योग्य वाटत नसल्या तरी भारतात अनेक बाबतीत टाटा कंपनीला मदर कंपनीचा दर्जा आहे.
 
ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या जीई इंडिया मधील अल्स्टॉम इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि आता हायोसंग इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नागेश तलवानी यांनी बीबीसीशी फोनवर चर्चा केली.
 
ते म्हणाले, "टाटांच्या वाढीचं एक प्रमुख कारण म्हणजे त्यांची नैतिकता, निष्पक्षता आणि पारदर्शक प्रणाली. यामुळे त्यांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांशी मजबूत बंध निर्माण झाले आहेत."
 
तलवाणी यांनी काही मुद्दे सांगून टाटांची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. त्यांच्या मते, भांडवली गुंतवणुकीबाबत टाटांकडे स्पष्ट दृष्टीकोन आणि धोरण आहे. याचं चांगलं उदाहरण म्हणजे स्टारबक्स, क्रोमा कॉन्सेप्ट आणि जग्वार ब्रँड आहेत.
 
ते म्हणाले की, "टाटांनी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून ब्रँडचं योग्य स्थान निश्चित केलंय. त्यामुळे देशभरातील ग्राहक त्यांच्याशी जोडले गेलेत. टाटा म्हटलं की त्यांना विश्वासार्ह आणि प्रामाणिक असा ब्रँड वाटतो."
 
त्यांनी पुढे सांगितलं की, त्यांच्या वाढीचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भावनिक निर्णय टाळणे आणि जोखीम संतुलित करण्यासाठी पोर्टफोलिओत बदल करून अतिशय स्पष्ट प्रशासन तयार करणे.
 
"त्यांची पुरवठा साखळी प्रभावी आहे आणि ते त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणाची पूर्ण काळजी घेतात."
 
टाटा पॉवरचे नवी दिल्ली येथील प्रकल्प व्यवस्थापक विवेक नारायण यांनी सांगितलं की, टाटांचा जग्वार घेण्याचा निर्णय चुकला असं बाजारात म्हटलं जात होतं पण नंतर हा निर्णय खूप यशस्वी ठरल्याचं दिसलं.
 
अशाच पद्धतीने टाटांनी इंडियन एअरलाइन्स परत विकत घेतली आहे. पण आज तिची दिशा आणि वेग ठरवणं कठीण आहे.
 
ते म्हणाले की, टाटांचं यश ही त्यांची विविधता आहे. त्यांनी कोणत्याही क्षेत्रात काम केलं तरी ते तिथे सकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनोज जरांगे समर्थकावर गुन्हा दाखल