Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अडचणीतील सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

eknath shinde
, शनिवार, 13 मे 2023 (09:08 IST)
मुंबई,: केंद्र आणि राज्य शासन सहकार खात्यामध्ये अमुलाग्र बदल घडविण्याचे काम करीत आहे. राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.
 
दादरमधील स्वामी नारायण मंदिराच्या योगी सभागृहात आयोजित को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियन,मुंबईचा ६३ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.  या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत, माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजित अडसूळ, धनवर्षा समुहाचे अध्यक्ष अंशुमन जोशी, युनियनचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे यांच्यासह युनियनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियनच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देवून मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले, बॅंका ह्या देशाची अर्थव्यवस्था आहेत. देशाची अर्थव्यवस्था ही जागतिकस्तरावर ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आली आहे. राज्याच्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी दावोस येथे कोट्यवधींचे औद्योगिक करार करण्यात आले आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात सहकार विभागात अमुलाग्र बदल केले जात आहेत. राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य करेल. त्यांच्या अडीअडचणींबाबत मार्ग काढला जाईल. को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियनच्या माध्यमातून बॅंकाना बळकट करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
 
को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॅाईज युनियन ही बॅंकेच्या एकेका कर्मचाऱ्याच्या पाठिशी ठामपणे उभी राहते, ही कौतूकास्पद बाब आहे. रंगभूमी आणि चित्रपटांमधील कलाकारांसह बॅंकांमध्ये देखील अतिशय उच्च स्तर असलेले कलाकार आहेत, हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. ज्या बॅंका, संस्थांमध्ये सांस्कृतिक चळवळ असते ती संघटना संस्कारी असते. हा अनमोल ठेवा जपला पाहिजे, अशी भावना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.
 
या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त बॅंकामधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नृत्य, गीतगायन, पोवाडे, नाटक, हास्यविनोद अशा विविध कलांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Karnataka Election Result 2023 Live: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल, भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची अपेक्षा