Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टोमॅटो दर शंभरी पार…! या शहरांमध्ये दर 100 रुपयांच्या पुढे

tamatar
, बुधवार, 28 जून 2023 (21:43 IST)
मुंबई : देशात टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली आहे. टोमॅटोंचे दर 100-120 रुपये प्रति किलो झाले आहेत. यामुळे अनेकांचं आर्थिक नियोजन बिघडलंय. त्यामुळे सर्वसामान्यांच्या वापरण्यात येणारा टोमॅटो विकत घेणे परवडेनासे झाले आहे. टोमॅटोचे भाव गेल्या काही दिवसांत दुप्पट ते तिप्पट झाले आहेत.
 
दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसह सर्वत्र टोमॅटोच्या दराने किचनचे बजेट बिघडवले आहे. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे.
 
मुंबईतील भायखळा भाजी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापर्यंत टोमॅटो 30 ते 40 रुपये किलोने विकले जात होते. मात्र आज येथे 80 ते 90 रुपये किलोने टोमॅटो विकला जात आहे. केवळ टोमॅटोच नव्हे तर सर्वच भाज्यांचे भाव 30 ते 40 टक्क्यांनी वाढले असल्याचे भाजी विक्रेते सांगतात.
 
टोमॅटो दिल्लीत 100 ते 140 रुपये किलो, तर दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये 160 रुपये किलो, गाझियाबादमध्ये 150 रुपये किलो आणि कानपूरमध्ये 100० रुपये किलोने मिळत आहे. घाऊक विक्रेते सांगतात की, गेल्या महिन्यात मंडईत टोमॅटोचा भाव 8-10 रुपये किलो होता, तर आता भाजीपाला बाजारात टोमॅटोचा भाव 70-80 रुपये किलो आहे. टोमॅटो खरेदीसाठी मंडईत आलेले किरकोळ व्यापारी सांगतात की, आता लोक पूर्वीपेक्षा कमी टोमॅटो घेत आहेत.
 
दरवर्षी टोमॅटो काढणीच्या वेळी टोमॅटो स्वस्त होतात आणि पाऊस सुरू होताच टोमॅटोचे पीक संपून टोमॅटोचे भाव वाढतात. त्याचा फटका दुकानदार आणि ग्राहक दोघांनाही बसतो. टोमॅटोचे भाव वाढण्याचे कारण म्हणजे टोमॅटोचे पीक संपले असून आता इतर राज्यांतून टोमॅटोची आयात करावी लागत असल्याने मालवाहतूक वाढली आहे.
 
महिनाभरापूर्वी टोमॅटो 10 ते 20 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता, मात्र साठवणुकीची सोय नसल्याने शेतकरी टोमॅटो साठवू शकत नाहीत. काढणीच्या वेळी टोमॅटोचे भाव खूपच कमी होतात. पीक संपल्याबरोबर टोमॅटोचे भाव गगनाला भिडायला लागतात. शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात साठवणुकीसाठी कोल्ड स्टोअर्स मिळाले, तर टोमॅटो वर्षभर साठवून वापरता येतील.
 
दरम्यान पुढील महिनाभर टोमॅटोचे दर वाढतच राहणार असल्याचे टोमॅटोच्या घाऊक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन पीक बाजारात आल्यानंतरच भाव खाली येतील. मात्र, टोमॅटोचे भाव अचानक वाढल्याने दुकानदार आणि ग्राहक दोघेही हैरान झाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या कारला बाईकची धडक! शिवसेना भवनासमोर घडली घटना