कोची: एखाद्या विख्यात कंपनीने आपल्या डिझायनर साड्यांच्या जाहिरातवजा कॅलेंडरवर ट्रान्सजेंडर्सना मॉडेल म्हणून निवडल्याची स्वागतार्ह सुरूवात केरळमध्ये घडली आहे.
शर्मिला या त्या कंपनीच्या अधिकारी महिलेने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की आम्ही साडयांच्या या कलेक्शनला नाव दिले आहे, मझाविल म्हणजे इंद्रधनुष्य. कारण हा इंद्रधनुष्यी झेंडा त्यांचे जगभरात प्रतिनिधित्व करतो.
भारतात तृतीयपंथांना हीन भावनेने पाहिले जाते. त्यांची कुचेष्टा केली जाते. त्यांना टाळले जाते. अशा पार्श्वभूमीवर शर्मिला यांनी ट्रान्सजेंडर्सची केलेली निवड ही विशेष ठरते. कॅलेंडरसाठी फोटोसेशन केलेल्या या दोन मॉडेल्स आहेत, माया मेमन आणि गोवरी सावित्री. विशेष म्हणजे त्यांना मॉडेलिंगचा काहीही अनुभव नाही. या अनोख्या प्रयोगाची सुरूवात झाली एक सामाजिक संस्था, करिलामुळे.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत शर्मिला पुढे सांगतात, हँडलूम साड्यांच्या नव्या कलेक्शनला कसे सादर करावे याचा विचार करत असतानाच माझी नजर राज्य सरकारने फेसबुकवर दिलेल्या एका पोस्टवर पडली. त्यात ट्रान्सजेंडर्सच्या आयुष्याला नवीन अर्थ देण्याबाबत म्हटले होते. सरकार जर समाजासाठी एवढे काही करीत असेल तर मलाही हातभर लावला पाहिजे या हेतूने मी मग पुढचे नियोजन केले.