Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

25 वर्षांपूर्वी गौतम अदानींचं अपहरण झालेलं तेव्हा...

gautam adani
, गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (15:41 IST)
- चंदन कुमार जजवाडे
भारतातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले गौतम अदानी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.
 
अदानी यांच्या साम्राज्याला हिंडनबर्गच्या एका अहवालामुळे मोठा हादरे बसले आहेत.
 
हा अहवाल प्रकाशित होण्यापूर्वी अदानी यांचा समावेश जगातील पहिल्या पाच श्रीमंतामध्ये होत होता.
 
हे स्थान हिरावून आता ते श्रीमंतांच्या यादीत पंधराव्या स्थानी घसरले आहेत.
 
श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स उद्योग समुहाचे मुकेश अंबानी पुन्हा एकदा गौतम अदानी यांच्यापेक्षा कितीतरी पुढे निघून गेले.
 
साहजिकच गौतम अदानी यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे.
 
नुकतेच गौतम अदानी यांनी एका भारतीय खासगी चॅनलला एक मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी आपल्याला आलेल्या काही कटू आठवणींना उजाळा दिला होता.
 
ते म्हणाले, आयुष्यात काही क्षण असे येतात की ते विसरून गेलेलंच बरं असतं.
 
अदानी यांनी यावेळी दोन घटनांचा प्रामुख्याने उल्लेख केला. यामध्ये एक घटना म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 चा मुंबई हल्ला. या दिवशी अदानींनी मृत्यू अत्यंत जवळून पाहिला होता.
 
हल्ल्याच्या वेळी अदानी हे ताज हॉटेलमध्येच उपस्थित होते. याठिकाणी झालेल्या गोळीबारात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
 
तर दुसऱ्या घटनेविषयी फारच कमी माहिती लोकांना आहे. ही घटना 1998 साली घडली होती. त्यावेळी बंदुकीचा धाक दाखवून त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणानंतर अदानींना सोडण्यासाठी त्यांच्याकडे 15 कोटी रुपयांची खंडणीही मागण्यात आली होती.
 
कसं झालं अपहरण?
1 जानेवारी 1998 रोजी गौतम अदानी हे शांतिलाल पटेल या आपल्या एका निकटवर्तीयाकडे गेले होते. पटेल यांच्या अहमादाबादमधील कर्णावती क्लबमधून बाहेर निघून ते दोघे मोहम्मदपुरा रोडकडे निघाले.
 
गुजरातचे ज्येष्ठ पत्रकार राज गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गौतम अदानी हे कर्णावती क्लबमधून बाहेर पडत असतानाच त्यांचं अपहरण करण्यात आलं. त्यावेळी कर्णावती क्लब हा अहमदाबादमधील सर्वात मोठा क्लब होता”
 
अदानी कारमधून निघाले असता त्यांच्या कारसमोर एक स्कूटर येऊन थांबली. त्यामुळे अदानी यांना आपली गाडी थांबवावी लागली.
 
त्याच वेळी एक व्हॅन तिथे आली. त्या गाडीतून तब्बल सहाजण बाहेर आले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून गौतम अदानी आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले शांतिलाल पटेल यांना आपल्या व्हॅनमध्ये बसवलं.
 
अपहरणानंतर दोघांनाही कोण्या एका अज्ञातस्थळी नेण्यात आलं.
 
अपहरणाची ही घटना गुरुवारी घडली. तर त्याच्या दोन दिवसांनी म्हणजेच शनिवारी गौतम अदानी आपल्या घरी सुरक्षित परतले.
 
या प्रकरणी अहमदाबादच्या सरखेज पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला होता.
 
अदानी कसे सुटले याविषयीच्या अनेक अफवा
उत्तर प्रदेशमध्ये IPS अधिकारी राहिलेले आणि यूपीच्या पोलीस टास्क फोर्सच्या संस्थापकांपैकी एक राजेश पांडेय यांनी याविषयी बीबीसीला माहिती दिली.
 
ते सांगतात, “अपहरणाची ही पद्धत बबलू श्रीवास्तव गँगची कार्यपद्धती होती. या अपहरणाची योजना बबलू श्रीवास्तव याने स्वतःच बनवली होती.”
 
पत्रकार राज गोस्वामी सांगतात, “गौतम अदानी यांना पोलिसांनी सोडवलं की ते स्वतः पळून आले की त्यांनी अपहरणकर्त्यांना मागितलेली रक्कम देऊ केली, याविषयी अनेक चर्चा केल्या जातात. पण त्या सगळ्या अफवा आहेत. अपहरणातून ने नेमके कसे निसटले, याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही.”
 
राजेश पांडेय यांच्या मते, “या प्रकरणात गौतम अदानी यांना वाचवण्यासाठी अपहरणकर्त्यांना पाच कोटींची खंडणी देण्यात आली होती. ही रक्कम दुबईत इरफान गोगाला देण्यात आली. इरफान गोगा हा खंडणीची रक्कम वसुल करणारा बबलू श्रीवास्तव गँगचा हस्तक होता.”
 
राजेश पांडेय यांना ही माहिती नंतर अपहरण आणि खूनाच्या प्रकरणात बरेली तुरुंगात कैदेत असलेल्या बबलू श्रीवास्तवने स्वतःच सांगितली, असा दावा त्यांनी केला.
 
त्या काळात अवैधरित्या पैशांची अफरातफरी करण्यासाठी हवाला हे मुख्य माध्यम होतं, असंही पांडेय यांनी सांगितलं.
 
त्यांच्या मते, गौतम अदानी यांनी अहमदाबादच्याच एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलं होतं.
 
अदानी या अपहरणामुळे इतके घाबरले की ते यासंदर्भात साक्ष देण्यासाठीही कधी आले नाहीत.
 
अखेर, अपहरणाच्या आरोपांखाली पकडलेले सर्व आरोपी न्यायालयातून सबळ पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त झाले.
 
सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता
इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसमधील एका बातमीनुसार, “गौतम अदानी यांना सोडण्यासाठी अपहरणकर्त्यांनी सुरुवातीला 15 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणात FIRही दाखल करण्यात आली. मात्र, 2018 च्या अखेरपर्यंत सर्वच आरोपींना या गुन्ह्याच्या आरोपांतून निर्दोष मुक्त करण्यात आलं.
 
गौतम अदानी यांच्या अपहरण प्रकरणातील आरोपपत्र 2009 मध्ये दाखल करण्यात आलं होतं. यामध्ये पूर्वाश्रमीचा गँगस्टर फजल उर रहमान उर्फ फजलू आणि भोगीलाल दर्जी उर्फ मामा या दोघांना मुख्य आरोपी बनवण्यात आलं.
 
फजल उर रहमान हा मूळचा बिहारचा राहणारा होता. त्याला 2006 मध्ये नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आली.
 
तर भोगीलाल दर्जी याला अदानींच्या अपहरण प्रकरणानंतर 14 वर्षांनी म्हणजेट 2012 मध्ये दुबईत अटक करून भारतात आणलं गेलं.
 
पण न्यायालयातील सुनावणीदरम्यान अपहरणकर्त्यांची ओळख पटवण्या प्रक्रियेत अदानी यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.
 
इतकंच नव्हे, तर अदानी हे संबंधित प्रकरणात साक्ष देण्यासाठी स्वतः कधी न्यायालयातही गेले नाहीत.
 
अखेर, सर्व आरोपींना दोन्ही मुख्य आरोपींना 2018 साली न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं.
 
यापूर्वीही ज्यांना ज्यांना या प्रकरणात आरोपी बनवण्यात आलं होतं, तेसुद्धा पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त झाले होते.
 
अपहरणाचं यूपी कनेक्शन
गौतम अदानी यांच्या अपहरणानंतर 1998 मध्येच 6 सप्टेंबर रोजी गुजरातचे आणखी एक करोडपती उद्योजक बाबूभाई सिंघवी यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला होता.
 
राजेश पांडेय यांच्या मते, "बाबूभाई सिंघवी हेसुद्धा आपल्या कारमध्येच होते. त्याच वेळी त्यांना आजूबाजूच्या एका स्कूटर आणि मारूती व्हॅनच्या हालचालींवर संशय आला. त्यांनी लागलीच आपली कार ही गर्दीच्या ठिकाणी नेली. हे प्रकरण गुजरातच्याच भुज जिल्ह्यातलं होतं.”
 
बाबूभाई सिंघवी हे तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत कसून तपास केला.
 
भुजचे तत्कालीन पोलीस अधीक्षक केशव प्रसाद यांनी तपासात निष्पन्न केलं की बाबूभाई सिंघवी यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला होता.
 
अपहरणकर्ते सातत्याने उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, मुंबई, नेपाळ आणि दुबईच्या काही फोन क्रमांकांच्या संपर्कात होते.
 
यामध्ये सर्वाधिक फोन हे लखनौच्या एका नंबरला लावण्यात आले होते.
 
त्यानंतर केशव प्रसाद यांनी यूपी पोलिसांच्या टास्क फोर्समधील अधिकारी अरूण कुमार यांच्याशी संपर्क साधला.
 
बबलू श्रीवास्तव गँगची भूमिका
बाबूभाई सिंघवी अपहरणाचा प्रयत्न प्रकरणात उत्तर प्रदेशातील कुख्यात आरोपी श्रीप्रकाश शुक्ल गँगचा सहभाग असू शकतो, असा संशय केशव प्रसाद यांना होता.
 
पण टास्क फोर्सने केलेल्या तपासात समोर आलं की श्रीप्रकाश शुक्ल गँग नव्हे तर बबलू श्रीवास्तव गँगशी संबंधित लोकच या प्रकरणात गुंतलेली होती.
 
बबलू श्रीवास्तव हा एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करायचा.
 
1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटांच्या प्रकरणानंतर दाऊद इब्राहिमच्या गँगमध्ये धार्मिक कारणांमुळे फूट पडली.
 
त्यानंतर बबलू श्रीवास्तव आणि छोटा राजन यांच्यासह इतर अनेक गुंडांनी स्वतःच्या वेगळ्या गँग बनवल्या.
 
बबलू श्रीवास्तवला 1995 मध्ये CBI ने सिंगापूरमधून अटक करुन भारतात आणलं होतं. टास्क फोर्सचे राजेश पांडेय यांच्या माहितीनुसार, बबलूला त्यावेळी इलाहाबादच्या जवळ नैनी तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.
 
यूपी टास्क फोर्सच्या तपासातच समोर आलं की गौतम अदानी यांचं अपहरणसुद्धा बबलू श्रीवास्तव गँगनेच केलं होतं. बबलू श्रीवास्तव तुरुंगातूनही आपली गँग चालवत असे.
 
राजेश पांडे यांच्या मते, बबलू श्रीवास्तवला अपहरणांचा मास्टरमाईंड मानलं जायचं. त्याने त्यावेळी देशभरातील पंधरापेक्षा जास्त करोडपती उद्योजकांचं अपहरण केलं होतं. यानंतर खंडणी स्वरुपात त्याने मोठी रक्कम वसूलही केली होती.
 
राजेश पांडेय सांगतात, “बबलू श्रीवास्तवने मला सांगितलं की त्याने गुरुवारी गौतम अदानी यांचं अपहरण केलं. अपहरणानंतर खंडणीसाठी बातचीत सुरू होती. त्यानंतर शनिवारी अदानी यांनी अपहरणकर्त्यांना म्हटलं की बँक उद्यापर्यंत बंद राहील. बँकेत गेल्याशिवाय 15 कोटी देऊ शकत नाही. मला शोधत पोलीस इथे येऊ शकतात. यानंतर खरंच पोलीस नंतर तिथेपर्यंत पोहोचले होते.”
 
या प्रकरणातील वरील सर्व माहितीसंदर्भात अदानी यांची बाजू बीबीसीला मिळू शकली नाही.
 
राजेश पांडे म्हणतात, “गौतम अदानी यांच्या प्रकरणासह इतर अनेक अपहरण आणि खून यांचा उल्लेख त्यांनी आपल्या युट्यूबवरील किस्सागोई व्हीडिओ सिरीजमध्ये केला आहे. पण अद्याप त्यांनी दिलेल्या या माहितीवर कुणीही प्रश्न उपस्थित केलेला नाही.”
 
ही काही ऐकीव गोष्टींवर आधारित नसून माझी चर्चा थेट बबलू श्रीवास्तवसोबत झाली होती, असा दावाही राजेश पांडेय यांनी केला.
 
वर्ष 1998 पर्यंत गौतम अदानी गुजरातचे मोठे उद्योगपती बनले होते. मोठ्या भावाच्या प्लास्टिक व्यवसायात प्रवेश 1988 ते 1992 मध्ये त्यांनी व्यवसाय प्रचंड वाढवला.
 
नंतर गौतम अदानी यांनी निर्यातीचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय पुढे 100 टनांवरून 40 हजार टनांपर्यंत जाऊन पोहोचला. मुंद्रा बंदराशी जोडल्यानंतर अदानी यांच्या व्यवसायाला मोठी उभारी मिळाली.
 
राजेश पांडेय यांच्या मते, गौतम अदानी यांचं अपहरण झालं, त्यावेळी ते राष्ट्रीय पातळीवर इतके लोकप्रिय उद्योगपती नव्हते.
 
त्यामुळेच त्यांच्या अपहरणाची चर्चा त्यावेळी सर्वसामान्य लोकांमध्ये फारशी झाली नव्हती. अजूनही लोकांना याबाबत खूप कमी माहिती आहे.”
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मृतदेह नष्ट करायला गेलेला मारेकरीही दरीत कोसळला, मित्र अडकला; नेमकं प्रकरण काय?