Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रथमेश शोधतोय हरवलेल्या गौरीला

प्रथमेश शोधतोय हरवलेल्या गौरीला
, शुक्रवार, 10 जून 2016 (12:40 IST)
आपली एखादी आवडती वस्तू हरवली तर मन बैचेन होते. महागडं घड्याळ किंवा स्मार्ट फोन चोरीला गेला असेल तर तो परत मिळवण्यासाठी काय काय धडपड करणार नाही. पोलिसांत तक्रार करण्यासाठी जाल आणि तिथे अगदी टुकार गोष्टीसाठी आलात असं वागवून तक्रार नोंदवलीच जात नसेल तर? कोणी तिथे आपलं ऐकूनच घेत नसेल तर? किती वाईट वाटत असेल न. हीच जर परिस्थिती आपली आवडती व्यक्ती हरवली असताना घडली तर… विचारच करवत नाही, हो ना?
 
हेच घडले आहे जियालाल श्रीवास्तव या मध्यमवयीन शेतकऱ्यासोबत. एका खेडेगावात आपली पत्नी लाजवंती (लाजो) आणि ६ वर्षाची मुलगी गौरी हिच्या सोबत गुण्या- गोविंदाने जगणाऱ्या जियालालची मुलगी अचानक बेपत्ता झालीये. मुलीच्या हरवण्याने हतबल झालेला जियालाल पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवायला जातो आणि तिथे आधीच हरवलेल्या एका 'गौरी' ला शोधण्यासाठी संपूर्ण पोलिस खाते व्यस्त आहे. हि दुसरी गौरी तेथील स्थानिक आमदार दुर्गविजय सिंग यांची आहे.
 
केवळ पैसा आणि सत्ता याच्या बळावर कोणत्या गोष्टीला महत्त्व प्राप्त होईल हे सांगता येत नाही. याच विषयावर प्रकाशझोत टाकणारे म.ल. डहाणूकर महाविद्यालय प्रस्तुत 'लौट आओ गौरी' हे नाटक रंगभूमीवर नुकतेच आले आहे. जियालाल या दु:खी आणि हतबल बापाची भूमिका साकारली आहे तरुणाईच्या लाडक्या दगडूने म्हणजेच प्रथमेश परब याने. हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर आणि मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू पसरवल्यानंतर 'लौट आओ गौरी' या हिंदी नाटकाच्या निमित्ताने प्रथमेशने हिंदी रंगमंचावर पदार्पण केले आहे.
webdunia
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या नाटकात प्रथमेशसह विभव राजाध्यक्ष, वेदांगी कुलकर्णी, सुव्रतो प्रभाकर सिंह, सिद्धेश पुजारे, तेजस्विनी कासारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'लौट आओ गौरी'चे  लेखक पराग ओझा असून पराग, कृणाल, सुशील या त्रयीने याचे दिग्दर्शन केले आहे. तर नेपथ्य हर्षद-विशाल, प्रकाशयोजना जयदीप आपटे, संगीत समीहन यांनी सांभाळले आहे. या एकांकिकेने युथ महोत्सव २०१४-१५ मध्ये सर्वोत्कृष्ट नाटक तृतीय क्रमांक पटकावला. तसेच हिंदी एकांकिका स्पर्धेत मानाची समजली जाणारी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा), इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी), आयआयटी मूड इंडिगो महोत्सवात 'तिसरी घंटा' स्पर्धा यांमध्ये सर्वोत्कृष्ट निर्मितीचे प्रथम पारितोषिक आणि भाऊसाहेब हिंदी एकांकिका स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून मान पटकावला आहे. याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शन, नेपथ्य या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
 
२२ मे रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभ झाला. या पहिल्याच प्रयोगाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे येत्या काळात 'लौट आओ गौरी' या नाटकाचे अनेक प्रयोग मुंबईत रंगणार आहेत. याची सुरवात १४ जून रोजी एनसीपीए सभागृहात सायंकाळी ६:३० वाजता होणार आहे. अशा या बहारदार कलाकृतीचा आनंद प्रेक्षकांना १७ जून रोजी सायंकाळी ७:३० वाजता साठ्ये सभागृह, विलेपार्ले, १८ जून रोजी रात्री ८ वाजता सावरकर स्मारक, दादर आणि २५ जून रोजी सायंकाळी ४:३० वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे घेता येणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उडता पंजाबची कथा