मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने खंत व्यक्त केली आहे. मोठ्या पडद्यावरील कलाकार मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना कमी लेखत असल्याचे तिने म्हटले आहे. हृता हिचा नुकताच टाईमपास ३ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हृता सध्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
छोट्या पडद्यावरील फुलपाखरु या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखले जाते. हृताने फुलपाखरु या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर झी मराठीवरील मन उडू उडू या मालिकेतून दिपूची भूमिका तिने साकारली होती. या मालिकेला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. हृता नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे. अनन्या, टाईमपास ३ या दोन्ही चित्रपटांमुळे ती अजूनही प्रसिद्धी झोतात आहे.
नुकतंच हृता दुर्गुळेने झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने मोठ्या पडद्यावरील कलाकार छोट्या पडद्यावरील कलाकारांना कमी समजतात, अशी खंत व्यक्त केली. झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकारासह राजकीय क्षेत्रातील आघाडीच्या महिला नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता येत्या भागात अभिनेत्री हृता दुगुळे आणि तिच्या सासूबाई मुग्धा शाह या हजेरी लावणार आहेत. याचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. यावेळी अभिनेते सुबोध भावे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना तिने ही खंत व्यक्त केली.
या कार्यक्रमात सुबोध भावे यांनी हृताला चित्रपटात काम करणारे कलाकार मालिकेत काम करणाऱ्यांना कमी लेखतात का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने पटकन हो असे म्हटले. त्यावर सुबोध भावेंनी काही क्षणात असे कोणते कलाकार आहेत, त्यांची नावं सांग असे सांगितले. त्यावर तिने मी नाव सांगणार नाही, पण हे खरं आहे. सेटवर त्यांच्या वागण्या बोलण्यावरुन त्यांच्या वाइब्सवरुन कळतं, असे म्हटले.
त्यावर सुबोध भावेंनी म्हटले की ते मोठ्या पडद्यावर दिसतात आणि तुम्ही छोट्या पडद्यावर म्हणून हा फरक आहे का? तर त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, मला का ते नेमकं माहिती नाही. पण सत्य परिस्थिती अशी आहे की मालिकेतील कलाकार हे फारच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. कारण ते दररोज घरी पोहोचतात. तिच्या या उत्तरावर प्रेक्षकांनीही तिला टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.