प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू नयेत आणि तुमचे गेलेले प्रेम यु टर्न मारून परत येण्यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे. प्रेमात बांबू कसे लागतात, यांची गोष्ट सांगणाऱ्या बांबू चित्रपटाचे टीझर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून येत्या २६ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित, विशाल देवरूखकर दिग्दर्शित बांबूच्या टीझरमध्ये तरूण -तरूणी बांबूच्या बनातून जाताना दिसत आहेत. आता त्यांच्या प्रेमकहाणीत नेमके काय बांबू लागले आहेत, हे चित्रपट आल्यावरच कळेल. अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात कलाकार नेमके कोण आहेत, हे जाणून घेण्याची आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरूखकर म्हणतात, मुळात तरूणाईला हा चित्रपट त्यांच्या आयुष्याच्या जवळपासचा वाटणारा आहे. युथला समोर ठेवून जरी या चित्रपटाची निर्मिती केली असली तरी तरूणांनी हा चित्रपट त्यांच्या पालकांसोबत पाहावा, असा आहे. २६ जानेवारीला बांबू प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा एक धमाल एंटरटेनर आहे.
निर्माते संतोष खेर म्हणतात, मुळात याची कथा आम्हाला विशेष भावली. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी बांबू लागतातच. मग ते प्रेमात असो वा इतर कशाही बाबतीत. अशीच प्रेमात बांबू लागल्याची गोष्ट आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार असून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा हा बांबू आहे.