Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज!

‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज!
, मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (09:53 IST)
महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाला त्या दरम्यान प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘प्लॅनेट मराठी’चे अक्षय बर्दापूरकर आणि ‘गोल्डन रेशो फिल्म्स’चे पियूष सिंह यांनी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘एबी आणि सीडी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला आणि आता जागतिक महामारीच्या परिस्थितीत योग्य ती काळजी घेऊन त्यांनी ‘चंद्रमुखी’ या त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात करण्याचे ठरविले. अक्षय बर्दापूरकर हे सलग तिसऱ्यांदा पियूष सिंह यांच्यासोबत चित्रपटाची निर्मिती करत आहेत. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट येत्या नोव्हेंबर महिन्यात ऑन फ्लोअर जाणार आहे. या जागतिक महामारीच्या प्रसंगातून सावरत पुढे येणारे हे पहिले मराठी बॅनर असेल.
 
चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार या बद्दल बोलताना दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, "दिग्दर्शक म्हणून माझा पुढील चित्रपट 'चंद्रमुखी' येत्या नोव्हेंबरला ऑन फ्लोर जातोय, अर्थात सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊनच शूटिंग केले जाईल. ब-याच दिवसांनी चित्रपटाच्या सेटवर जातोय, नवीन कामाची सुरुवात होतेय, याचा आनंद आहेच, पण त्याचसोबत जबाबदारी देखील आहे. जानेवारीमध्ये 'चंद्रमुखी'चं पोस्टर तुम्ही पाहिलंत, त्याला खूप प्रेम दिलंत... आता तुम्हांला जाणून घ्यायचं असेल की "चंद्रमुखी" च्या भूमिकेत नक्की कोणती अभिनेत्री आहे आणि इतर कलाकार सुद्धा कोण आहेत...या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची आणि माझी नवीन कलाकृती लवकरात लवकर तुमच्या समोर आणण्याची माझी देखील इच्छा आहे...!!! नेहमीप्रमाणे तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी असुद्या...!!! लवकरच शूटिंगचा श्रीगणेशा होणार आहे...!!! गणपती बाप्पा मोरया...!!!"
 
हिंदी, तामिळ आणि इंटरनॅशनल चित्रपट सृष्टीत बरेच मोठे प्रोजेक्ट्स केल्यानंतर गोल्डन रेशो फिल्म्सने ‘एबी आणि सीडी’च्या निमित्ताने मराठीतही निर्मितीची सुरुवात केली. ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर गोल्डन रेशो फिल्म्सचे COO पियुष सिंह पुढे देखील मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यास तयार आहेत. ‘चंद्रमुखी’ हा त्यांचा पॅशन प्रोजेक्ट आहे. याविषयी त्यांचे मत व्यक्त करताना त्यांनी म्हटले की, “पूर्वा पेक्षा आताचा प्रेक्षक वर्ग हा चित्रपटाच्या विषयासाठी अगदी हळवा आणि संवेदनशील आहे. या चित्रपटाला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्हांला उत्तम टीम लाभली आहे. याक्षणी कलाकार आणि कथानकाविषयी फारसे बोलू शकत नसलो तरी आम्हांला खात्री आहे की प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल.”
 
अक्षय बर्दापूरकर यांच्यासाठी हा केवळ एक चित्रपट नसून हा ‘लार्जर दॅन लाईफ प्रोजेक्ट’ आहे आणि यावर टिप्पणी करताना त्यांनी म्हटले की, “विषयाच्या कथेसह प्रेक्षकांना एक सुंदर अनुभव देणारा चित्रपट म्हणून ‘चंद्रमुखी’ हे उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटाची कथा एका स्त्री भोवती फिरते जी समाजात चालणा-या अपारंपारिक मार्गावर  स्वत:च्या वास्तवतेचा शोध घेते. चित्रपटाची कथा सांगण्यास आम्ही उत्साही आहोत, पण त्याच वेळी विश्वास पाटील यांची बेस्टसेलरची सत्यता टिकवून ठेवण्याची देखील मोठी जबाबदारी आहे. मराठी चित्रपटसृष्टीला आणखी उंचीवर नेण्याचे आश्वासन या चित्रपटाने दिले आहे.”
 
प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स् निर्मित या चित्रपटात प्रसाद ओक यांचे दिग्दर्शन, चिन्मय मांडलेकर यांची पटकथा, संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी, निलेश वाघ यांचं कला दिग्दर्शन पाहायला, अनुभवयाला मिळणार आहे आणि ब-याच वर्षांनी अजय-अतुल यांचं अस्सल मातीतलं संगीत ऐकण्याची संधी देखील मिळणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गौरी खानचा खुलासा - मन्नतमध्ये झालेले काम दिल्लीहून नियंत्रित करते, कर्मचार्‍यांना कॉलद्वारे ऑर्डर मिळतात