Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रवींद्र महाजनी यांचं निधन; दोन-तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज

ravindra mahajani
, शनिवार, 15 जुलै 2023 (10:14 IST)
social media
अभिनेते रवींद्र महाजनी यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला.
 
मराठी सिनेसृष्टीतलं 1970,1980 च्या दशकातलं एक देखणं आणि रुबाबदार व्यक्तिमत्त म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत.
 
त्यामुळे रवींद्र महाजनी यांच्या जाण्यानं मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.
 
शुक्रवारी (14 जुलै) सायंकाळी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह बंद खोलीत आढळला.
 
शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केल्याचं महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे.
 
सात ते आठ महिन्यांपासून ते या ठिकाणी एकटेच राहायला होते अशी माहिती समोर आली आहे
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्वीट करत म्हटलंय की, “आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.”
 
अभिनेता गश्मीर महाजनी हा रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे.
 
गश्मीरच्या एका चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत रवींद्र म्हणाले होते की, “मी मुलाला नृत्याच्या टिप्स नाही देत. उलट मीच माझ्या मुलाकडून कधीकधी नृत्याच्या टिप्स घेत असतो. अभिनयाच्या टिप्सही मी त्याला देत नाही.
 
अभिनय हा आपला आपणच करायचा असतो, असं मी त्याला नेहमी सांगत असतो. आपल्या मुलानं प्रत्येक धाटणीचे चित्रपट करावेत, अशी माझी इच्छा आहे.”
 
महाजनी यांचा प्रवास
रवींद्र महाजनी यांचा जन्म पुण्यात आला. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती.
 
वडिलांच्या निधनानंतर रवींद्र यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी आली.
 
लोकमत फिल्मीनुसार, रवींद्र यांनी सुरुवातीला टॅक्सीचालक म्हणून काम केलं. त्याकाळी रवींद्र दिवसा अभिनयाचे धडे गिरवायचे आणि रात्री टॅक्सी चालवायचे.
 
मधुसूदन कालेलकर यांच्या 'जाणता अजाणता' या नाटकातून महाजनींना अभिनयाची संधी मिळाली.
 
याच नाटकाचा प्रयोग पाहून शांतारामबापूंनी रवींद्र महाजनींना 'झुंज' या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवडलं. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला.
 
या मराठी चित्रपटाद्वारे ते घराघरात पोहचले.
 
रवींद्र महाजनी यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला.
 
त्यांचे लक्ष्मीची पाऊले, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता, कळत-नकळत, हे चित्रपट विशेष गाजले.
 
रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Urfi Javed: उर्फी जावेद बॉलिवूडमध्ये एकता कपूरच्या या चित्रपटातून पदार्पण करणार