घरात आनंद आणि सुख समृद्धी घेऊन येणारा सण म्हणजे दिवाळी. कोरोनाच्या नियमांमुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी मात्र संगीताचे सुमधूर सुर ऐकत दिवाळीचे स्वागत करण्यासाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाला आपल्याला हजेरी लावता येणार नाही. या सांगितीक कार्यक्रमाला जरी आपल्याला हजेरी लावता येणार नसली तरी ही कमी भासू न देण्यासाठी 'प्लॅनेट मराठी ओटीटी' एक जबरदस्त संगीतमय कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. मराठी संगीत परंपरा समृद्ध आणि विशाल करण्यासाठी अनेक कलाकारांचे अमूल्य योगदान राहिले आहे. या महान कलाकारांपैकीच एक असलेल्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे २०२१ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने संगीत विश्वाला पंडितजींनी दिलेल्या अनेक अजरामर कलाकृतींचे स्मरण म्हणून 'प्लॅनेट मराठी ओटीटी' आपल्या प्रेक्षकांसाठी 'भीमण्णा' हा कार्यक्रम घेऊन येत आहे. भीमण्णा या नावाने लोकप्रिय असलेल्या पंडितजींना समर्पित केलेल्या या कार्यक्रमाला हे नाव अगदी समर्पक वाटते. या कार्यक्रमात पंडितजींची तीर्थ विठ्ठल, सखी मंद झाल्या तारका, मिले सुर मेरा तुम्हारा ही आणि अशी अनेक अजरामर गाणी प्रेक्षकांना ऐकता येणार आहेत. हा कार्यक्रम 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर ५ नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभर पाहाता येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उस्ताद रशिद खान हे पंडितजींची गाणी गाणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बर्वे करणार असून पंडितजींचे कुटुंबिय, स्नेही यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. पंडितजींना इतर घराण्यांबद्दल, समकालीन गायकांबद्दल किती आदर होता. वयाने लहान असलेल्या कलाकारांचे ते नेहमीच कौतुक करत असत. पंडीतजी कलाकार म्हणून श्रेष्ठ तर होतेच पण माणूस म्हणूनही कीती थोर होते ते प्रेक्षकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.
'भीमण्णा' या कार्यक्रमाविषयी 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''आपल्या संस्कृतीमध्ये दिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे. दिवाळी हा आनंदाचा, चैतन्याचा सण. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी 'भीमण्णा' हा कार्यक्रम 'प्लॅनेट मराठी ओटीटी' आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. पंडीत भीमसेन जोशी यांचे संगीत विश्वातील योगदान अमूल्य आहे. हा कार्यक्रम इतर कार्यक्रमांपेक्षा वेगळा ठरणार आहे. या कार्यक्रमातून त्यांच्या अजरामर गाण्यांबरोबरच ते माणूस म्हणूनही किती थोर होते हे प्रेक्षकांसमोर उलघडणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे. पंडितजींच्या या गाण्यांमुळे ही दिवाळी अधिकच चैतन्यमय होऊन जाईल.''