Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी

'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी
, बुधवार, 25 एप्रिल 2018 (13:42 IST)
उमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील  प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार? हि बऱ्याच दिवसांपासून लागलेली उत्कंठा आता संपली आहे. कारण, नाट्यरसिकांकडून अनेक तर्कवितर्क केल्या जाणाऱ्या या भूमिकेसाठी, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचे नाव आता निश्चित झाले आहे. विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात नुकत्याच पार पडलेल्या या नाटकाच्या २७५ व्या प्रयोगानंतर उमेश-स्पृहाद्वारे करण्यात आलेल्या फेसबुक लाईव्हमधून स्वानंदीच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात या नाटकामधून स्पृहाऐवजी स्वानंदी उमेशबरोबर रंगभूमी शेअर करताना दिसून येणार आहे.

चांगलं बुकिंग घेत असलेल्या खूप कमी मराठी नाटकांमधील एक असणाऱ्या या नाटकातील नव्या प्रणोतीबद्दल बोलताना स्पृहाने अशी माहिती दिली कि, 'या नाटकाचा आज झालेला २७५ वा प्रयोग माझा शेवटचा प्रयोग असून, यापुढे स्वानंदी टिकेकर माझी भूमिका करताना तुम्हाला दिसेल. माझ्या काही प्रोफेशनल कमिंट्समेंटमुळे मला हे नाटक सोडावं लागतंय. पण, हे नाटक आजच्या काळाच महत्वाचं नाटक आहे. या नाटकाचा विषय खूप महत्वाचा असल्यामुळे,माझ्या नसण्याने एक चांगला विषय बंद होणं योग्य नाही. त्यामुळे या नाटकाच्या पुढील प्रवासात माझ्या जागेवर स्वानंदी टिकेकर हा नवा चेहरा तुमच्यासमोर येणार आहे. माझ्या भूमिकेवर जसे भरभरून प्रेम केले अगदी तसेच प्रेम तुम्ही स्वानंदीवर देखील कराल अशी मी आशा करते'.

'डोण्ट वरी बी हॅप्पी' नाटकातील या महत्वपूर्ण बदलाबद्दल सांगताना, स्पृहा एक मेहनती अभिनेत्री असून, तिच्यासोबतचा पार केलेला या नाटकाचा दीर्घ प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे उमेश सांगतो. तसेच प्रणोतीच्या भूमिकेत दिसणाऱ्या स्वानंदीबद्दल बोलताना, स्वानंदी हुशार आणि कुशल अभिनेत्री असून, तिच्यासोबत काम करायला आपण खूप उत्सुक असल्याचे त्याने सांगितले.
webdunia

पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केली आहे. सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित, मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील उमेश- स्पृहाची जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हिट ठरली होती. त्यामुळे 'स्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला योग्य न्याय देण्याचे आव्हान माझ्यावर आहे. एका गाजलेल्या भूमिकेला कोणत्याही प्रकारचा तडा न लागू देता, त्या भूमिकेत समरसून जाण्याचे काम मला करायचे आहे. त्यासाठी मी विशेष मेहनत घेणार असून, नाटकाच्या पुढील प्रवासात या नव्या प्रणोतीला पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा येतील, याचा मी प्रयत्न करेल',असे स्वानंदीने सांगितले.

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेच्या पहिल्या आणि दुस-या भागातून लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या स्वानंदीने यापूर्वीच आपल्या अभिनय कौशल्याद्वारे स्वतःचा खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. शिवाय सुमित राघवनसोबत '१०३' या नाटकाद्वारे तिने रंगभूमीदेखील गाजवली असल्याकारणामुळे, स्वानंदी नाट्यरसिकांना आपल्या अभिनयाद्वारे 'डोण्ट वरी बी हॅप्पी' ठेवण्यास नक्कीच यश मिळवेल अशी आशा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८