Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गणेश आचार्य यांच्या हातातील ‘हा’ चिमुकला बनलाय मराठीतील पहिला ॲक्शन-डान्सिंग स्टार

गणेश आचार्य यांच्या हातातील ‘हा’ चिमुकला बनलाय मराठीतील पहिला ॲक्शन-डान्सिंग स्टार
, शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019 (14:31 IST)
सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या हातात असलेला हा चिमुकला स्वत: स्टंट्स - ॲक्शनसीन्स आणि उत्तम डान्स करणारा हीरो बनून चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडले असतील की हा मुलगा नेमका आहे कोण? आणि गणेश आचार्य यांच्याशी त्याचे काय नाते आहे? हा चिमुकला आहे समीर आठल्ये दिग्दर्शित आणि राजकुमार मेंडा निर्मित ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या मराठीतील पहिल्या भव्य ॲक्शन चित्रपटाचा नायक चैतन्य मेस्त्री. चैतन्य हा मुंबई-सांताक्रुझ येथील प्रभात कॉलनीतील तेली चाळीत एका सामान्य कुटुंबात जन्मलेला नुकताच पदवीधर झालेला एक तरूण आहे. ही तीच सांतांक्रुझ मधील वस्ती आणि चाळ आहे. जिथे सुप्रसिद्ध नृत्य-सिने दिग्दर्शक गणेश आचार्य यांचे बालपण गेले आणि कारकिर्द घडली.
 
गणेश आचार्य यांचा बालपणीचा जिवलग मित्र, सहायक आणि नृत्यदिग्दर्शक दिलीप मेस्त्री यांचा चैतन्य हा मुलगा आहे. दिलीप आणि दीपा हे दोघेही गणेश आचार्य यांच्याकडे डान्सर आणि सहायक म्हणून कार्यरत होते. कालांतराने दिलीप आणि दीपा मेस्त्री हे स्वतंत्र नृत्यदिग्दर्शन करू लागले. पण, गणेश आचार्य यांचे मेस्त्री कुटुंबियांशी आणि प्रभात कॉलनीशी आजही जवळचे संबंध आहेत. चैतन्यसाठी गणेश आचार्य ह्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक व्हीडीयो त्यांच्या इंन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरून प्रसारीत केले आहेत.
 
“तेली चाळीत राहात असतानाच मी स्वप्न पाहिलं होतं, की कोरीयोग्राफर बनायचं! आणि ते पूर्ण झालं. तसंच ॲक्शनहीरो बनायचं स्वप्न घेऊन वाढलेला चैतन्य, ज्याला मी लहानपणी अंगाखांद्यावर खेळवलं....ज्याला मी माझा भाचा मानतो....त्याचं ‘बकाल’ ह्या मराठीतील पहिल्या ग्रॅण्ड ॲक्शन फिल्मच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण होतंय. मला अभिमान आहे की मी ज्या चाळीत-वस्तीत वाढलो आणि आज ह्या स्थानावर आहे. त्याच एरीयातला, माझ्या हृदयाच्या जवळ असलेला चैतन्य फिल्म इंडस्ट्रीत एंट्री करतोय....स्वत: सर्व स्टंट्स- ॲक्शन करतोय..मी तर म्हणेन, की हा दुसरा टायगर श्रॉफ आहे.” - गणेश आचार्य.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ही म्हण चैतन्यला तंतोतंत लागू पडते. अक्षय कुमारची जबरदस्त फॅन असलेल्या चैतन्यच्या आईला आपल्याला मुलगा झाला तर तो अक्षय कुमार सारखा चपळ आणि डान्स करणारा असावा, असं गरोदरपणात वाटत होतं. आणि बरोबर 9 सप्टेंबर रोजी, अक्षय कुमारच्या वाढदिवसादिवशी चैतन्यचा जन्म झाला. वीस वर्षीय चैतन्य वयाच्या चौथ्या वर्षी कौतुकाने आणलेल्या स्केटींग्स पायाला बांधुन सहज वावरत होता. त्यानंतर दुमजली घराच्या छतावर पाईप-ग्रीलच्या साहाय्याने पतंग उडवण्यासाठी चपळाईने क्षणार्धात चढू लागला. दहीहंडी फोडण्यासाठी तो कायम वरच्या थरावर कृष्ण बनुन जाऊ लागला. पण, चैतन्याच्या अतिउत्साही चपळाईने शेजारी-पाजारी हवालदिल झाले होते. कधीही, कुठेही चैतन्याच्या शारीरिक कसरती सुरू व्हायच्या आणि इतरांच्या वस्तुंचे तसेच घराचे नुकसान होत होते. इतकेच नव्हे तर मित्रांबरोबर खेळ खेळताना काही बिनसले तर चैतन्य फिल्मी स्टाईल हाणामारी करू लागला. हे प्रताप घरापर्यंत येऊ लागल्याने त्याच्या आई-वडीलांनी त्याला स्केटींग, फुटबॉल, हॉकी, कीक बॉक्सिंग खेळण्यासाठी बाहेर क्लास लावले. नृत्य चैतन्यच्या रक्तातच आहे. वयाच्या तेराव्या वर्षी चैतन्य ने रोलर हॉकी (स्केटींग हॉकी) प्रकारात मुंबईचे नेतृत्व केले. फावल्या वेळात तो जुहू बीचवर जाऊन कोलांट्या उड्या, उंचावरून उड्या मारणे. हवेत एकापेक्षा जास्त कोलांट्या मारणे, इमारतींवर चढणे असे पैज लावून प्रकार खेळू लागला. 
webdunia
अशातच दिग्दर्शक समीर आठल्ये यांना त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ॲक्शनफिल्मसाठी एक चपळ नायक हवा होता. त्यांनी परिचित असलेल्या नृत्यदिग्दर्शक दिलीप मेस्त्रींना बोलता बोलता ही गोष्ट सांगितली आणि दिलीप मेस्त्री यांनी मोबाईल मध्ये चित्रीत केलेले चैतन्यचे थरारक आणि अविश्वसनीय कारनामे दाखवले. समीर आठल्येंनी चैतन्यला बोलावून घेलते. ॲक्शन –स्टंट्सचा प्रश्नच नव्हता. पण, त्याला संवादफेकीचे प्रशिक्षण दिले आणि आज चैतन्य मेस्त्री हा अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांच्याप्रमाणे स्वत: स्टंट्स- ॲक्शन करणारा तसेच उत्तम नृत्य करणारा असा मराठीतील पहिला ॲक्शन-डान्सिंग हिरो म्हणून बकालच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. 
 
बकाल ह्या चित्रपटासाठी चैतन्यने पारकोर जम्प्स, पॅराग्लायडींग, स्कुबा डायव्हींग, सिंगल लायनर स्केटींग, रॉक क्लायबिंग, जिमनॅस्टीक्स, बॉडी बिल्डींग आदि साहस प्रकारांचा सराव केला आहे. चित्रपटात सातव्या मजल्यावरून दुसऱ्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर उडी मारणे, समुद्राच्या तळाशी पोहणे. दरीमध्ये पॅराग्लायडींग करणे, डोंगराच्या सुळक्यावरून धावणे, कोसळणाऱ्या धबधब्यात प्रवाहाविरुद्ध दोरखंडाच्या साहाय्याने चढणे, ब्रीजच्या रेलिंगवर स्केटींग करणे, पाठलाग सीन मध्ये भररस्त्यात भरधाव बाईक चालवणे, इमारतींच्या गच्चीवर चढणे, एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उड्या मारणे तसेच हाणामारीची सर्व दृश्ये ॲक्शन डायरेक्टर अंदलीब पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: केलेली आहेत. चैतन्य सोबत झी मराठीवरील ‘एका पेक्षा एक – छोटे चॅम्पियन्स’ ह्या डान्सींग रीॲलिटी कार्यक्रमाची आणि मटा श्रावणक्वीन-२०१७ ची उपविजेती जुई बेंडखळे ह्या नवोदित अभिनेत्रीने मुख्य नायिका साकारली आहे. अशोक समर्थ, अलका कुबल, गणेश यादव, यतीन कारेकर, मिलिंद गवळी, असीत रेडीज, जयंत सावरकर, पुजा नायक आदी मातब्बर कलावंतांचा अभिनय ‘बकाल’ ह्या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 
ऐंशीच्या दशकात विदर्भात घडलेल्या एका सत्यघटनेवर आधरीत असलेला, शिव ओम् व्हीज्युअल्स प्रा. लि. प्रस्तुत मराठीतील पहिला भव्यदिव्य असा थरारक ॲक्शनपट ‘बकाल’ येत्या ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिशा पटनीने केल्विन क्लीनचे इनरवेअरमध्ये हॉट पोझेस दिल्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे