राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या सहकार्याने आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हल(SCO) मध्ये तब्बल १४ चित्रपटांपैकी सर्वोत्तम चित्रपट म्हणून जिओ स्टुडिओजच्या मराठी चित्रपट गोदावरी ची निवड करण्यात आली आहे.
मुंबई मध्ये २७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान मोठया दिमाख्यात पार पाडलेल्या या महोत्सवात भारतातील नामांकित सिनेमांची वर्णी लागली होती आणि त्यात गोदावरी या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्म म्हणून पुरस्कार मिळणे ही गौरवशाली बाब आहे.
मा. श्री. प्रसून जोशी आणि श्री. आर माधवन यांच्या हस्ते गोदावरी चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. निखिल महाजन आणि जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंट हेड श्री. निखिल साने यांना हा पुरस्कार सोपवण्यात आला. ह्या गौरवशाली सोहळ्यात चित्रपटाचे नायक जितेंद्र जोशी, नायिका गौरी नलावडे आणि टीम उपस्थित होती.
चित्रपटाबद्दल सांगायचे तर ११ नोव्हेंबर २०२२ ला सिनेमागृहांमधे प्रदर्शित झाल्यानंतर अनेक फिल्म समीक्षक, मराठी सेलिब्रिटी आणि प्रेक्षक यांनी या सिनेमाचे प्रचंड कौतुक केले होते. तसेच या सिनेमाने प्रदर्शनाच्या आधीच परदेशातील अनेक महत्वाच्या चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवली होती.