सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राजकपूर पुरस्कार आणि चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार तसेच ५४ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा २०१७ सांस्कृतिक मंत्री श्री. विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे रेक्लमेशन, म्हाडा मैदान क्र.१, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे पार पडला. ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सायरा बानो यांना राजकपूर जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी आणि व्ही.एन.मयेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ अभिनेते श्री.विक्रम गोखले यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी व व्ही.एन.मयेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते जॅकी श्रॉफ यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कार आणि मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते श्री. अरुण नलावडे यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार व किरण शांताराम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार तसेच मुंबईचे महापौर श्री. विश्वनाथ महाडेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ५४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सहात कासव हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक १ ठरला तर सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक २ चा मान दशक्रिया याचित्रपटाला आणि सर्वोकृष्ट चित्रपट क्रमांक ३ चा मान व्हेंटिलेटर या चित्रपटाला मिळाला आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मंगेश देसाई यांना एक अलबेला या चित्रपटासाठी मिळाला तर उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार इरावर्ती हर्षे यांना कासव चित्रपटासाठी प्राप्त झाला आहे.
आगामी काळात मराठी चित्रपटांच्या प्रमोशनासाठी राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलणार आहे. मराठी चित्रपटांचा प्रसार हा राज्यासह देशभरात व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांनी सांगितले.