लेखक-दिग्दर्शक श्याम माहेश्वरी यांचे मराठीत पदार्पण
क्युं की सास भी कभी बहु थी, कहानी घर घर की, कसोटी जिंदगी की, कसम से, हवन, माटी की बन्नो, सात फेरे, बंधन ते अलिकडच्या जोधा अकबर आणि एक दुजे के वास्ते, आदी जवळपास पंधराहून अधिक टीव्ही मालिकांच्या हजारो भागांचे लेखन-दिग्दर्शन करणारे श्याम माहेश्वरी ‘चरणदास चोर’या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. १९९४ पासून ते २०१४ पर्यंत सतत टेलिव्हीजन डेली सोप केल्यानंतर श्याम माहेश्वरी यांनी क्रिकेटपटू महेन्द्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारीत ‘एम. एस. धोनी – दी अनटोल्ड स्टोरी’या चित्रपटासाठी संशोधन व पटकथा लेखनात सहाय्य केले. ‘के’सिरीजसह गेली वीस वर्षे टीव्ही मालिका आणि एम. एस. धोनी सारख्या सुपरहीट चित्रपटाचे लेखन केल्यानंतर श्याम माहेश्वरी यांनी मराठी चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन तसेच निर्मिती करणे, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. हिंदी टेलिव्हीजन आणि बॉलीवूडमध्ये लेखन-दिग्दर्शन केलेल्या श्याम माहेश्वरी यांचा 29 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणारा ‘चरणदास चोर’हा नक्कीच उत्सुकता वाढविणारा आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या निर्मिती संस्थेच्या ‘दर्द’या मालिकेपासून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून श्याम माहेश्वरी यांची सुरूवात झाली. जवळपास वीस वर्षे टीव्ही मालिका लेखन-दिग्दर्शनात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. सिनेदिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचे सोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. दिग्दर्शनासोबत लेखनात हातखंडा असलेल्या श्याम माहेश्वरी यांना नीरज पांडे यांनी एम. एस. धोनी चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी सोपवली आणि ती त्यांनी यशस्वी करून दाखवली. नीना गुप्ता, बालाजी टेलिफिल्म्स यांच्यामार्फत आलेली कल्पकता, अनुभव सिन्हांसारख्या दिग्गज दिग्दर्शकाकडून शिकलेले तंत्र आणि ऋषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी यांच्या सिनेमाचा प्रभाव...यासर्व अनुभवातून ‘चरणदास चोर’ही कलाकृती घडली आहे.
चरण चंद्रकांत मोरे या साध्या व गरीब स्वभावाच्या चाकरमान्याची ही गोष्ट आहे. अनावधानाने त्याच्याकडून एक चोरी होते. चोरी साधीसुधी नाही तर तब्बल दोन कोटी रुपयाची आहे. दोनशे रुपये खर्च करण्याची अक्कल नसलेल्या चरण मोरेचा चोरी केल्यानंतरचा रोलर कोस्टर प्रवास अत्यंत मार्मिक, खुमासदार विनोदी पद्धतीने दाखविण्यात आला आहे. बऱ्याच काळानंतर सात्विक आणि सकस विनोद ‘चरणदास चोर’या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या 29 डिसेंबर रोजी चरणदास चोर महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.