सर्वसामान्यांच्या जगण्याचा वेध घेणाऱ्या मराठी चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. समाजातील वास्तव मांडणारे सिनेमे मनोरंजनासोबतच कटू सत्य सादर करण्याचंही काम करीत असतात. वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांतून नावाजल्या गेलेल्या गाभ चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय मराठी रुपेरी पडद्यावर २१ जूनला येत आहे. गाभ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत.
मनुष्य आणि प्राणी यांना केंद्रस्थानी ठेवून गाभ चित्रपटाची कथा मांडली आहे. ही कथा एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करते. या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका अभिनेता कैलास वाघमारे यांनी आपल्या दादू या पात्रातून साकारली आहे. स्वत:च्या म्हशीसाठी एका रेड्याचा शोध घेताना माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा हळव्या प्रेमाच्या माध्यमातून दाखवणारा गावच्या रांगड्या मातीतला गाभ चित्रपट आहे.
गाभ चित्रपटात कैलास वाघमारे, सायली बांदकर, विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत. छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रविंद्र चांदेकर यांचे आहे. गीते आणि संगीत, आणि साउंड डिझाइनची जबाबदारी चंद्रशेखर जनवाडे यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत रविंद्र चांदेकर यांचे आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. रंगभूषा विजय ढेरे, वेशभूषा चैताली गानू, केशभूषा रामेश्वरी, मोहिनी चव्हाण यांची आहे. व्हीएफक्स माधव चांदेकर तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी कै.सुंदर कुमार यांनी सांभाळली आहे. प्रोडक्शन मॅनेजर रंगराव पाटील आहेत.
२१ जूनला गाभ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.