'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं', प्रेमाची हि कधीच न बदलणारी संकल्पना एका नव्या रुपात मोठ्या पडद्यावर सादर होत आहे. सैमामित प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित 'प्रेमवारी' या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे, या आगामी सिनेमाबाबत आणखीन काही माहिती हाती आली नसली तरी, या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले असल्याचे समजते. या सिनेमाच्या चित्रीकरणाला सध्या सुरुवात झाली असून, अहमदनगर येथील कोपरगाव तालुक्यातील वारी गावात या सिनेमाचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. या शुभारंभ कार्यक्रमात कोपरगावचे शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, अहमदनगरचे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, संजीवनी कोलेज ऑफ इंजिनीरचे डिरेक्टर सुनील दादा कोल्हे, शिर्डी नगराध्यक्ष अभय भैय्या शेळके आणि शिर्डी संस्थान सदस्य सचिंत तांबे आदी. मान्यवर उपस्थित होते.
एक सुंदर प्रेमकथा घेऊन येणाऱ्या या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, निर्माते आणि प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे. या सिनेमातील प्रमुख कलाकारांबाबत तूर्तास मौन बाळगण्यात आले आहे. 'प्रेमवारी' हा चित्रपट प्रेमाच्या गुलाबी दुनियेची सफर घडवून आणण्यास लवकरच येत आहे.