प्रिया बापट आणि उमेश कामत ही लोकप्रिय जोडी आहे. त्यांचे 2010 मध्ये प्रदर्शित झालेले व्यावसायिक नाटक 'नवा गडी नवा राज्य'ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता तब्बल 9 वर्षानंतर ही जोडी एका नव्या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
एका इंस्टाग्रामच्या लाईव्ह सेशनच्या माध्यमाने त्यांनी ही बातमी दिली. ही जोडी इरावती कर्णिक यांनी लिहिलेल्या 'जर तरची गोष्ट या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकत्र येणार आहेत. नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग मुंबई आणि पुण्यात होणार आहे. या नाटकाची तालीम सुरु झाली असून येत्या 5 ऑगस्टला गडकरी रंगायतन येथे प्रयोग होईल. तर दुसरा प्रयोग 12 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे.
उमेशने इंस्टावर या नाटकाचा प्रोमो शेअर करत "प्रियाबरोबर मी खूप वर्षांनी रंगभूमीवर एकत्र काम करणार आहे. जर आपण पुन्हा एकत्र काम केलं तर? या जर आणि तर चा प्रवास 'जर तर च्या गोष्टीं पर्यंत पोहोचला आहे. जर आणि तर मध्ये अडकलेल्या नात्याची हसण्याची आणि रुसण्याची ही आजची गोष्ट तु्म्हाला नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे.
या नाटकात प्रिया बापट , उमेश कामत , पल्लवी अजय, आशुतोष गोखले हे प्रमख भूमिकेत दिसणार. इरावती कर्णिक यांनी नाटकाचे लेखन केले आहे. तर अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी दिग्दर्शन केलं आहे.