अतिशय वास्तवादी आणि विचार करायला लावणारे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न तयार झाले असतील. या प्रश्नांचे उत्तर तर चित्रपट पाहिल्यावर मिळेलच. तत्पूर्वी, या चित्रपटाचा ट्रेलर पाहून दिग्दर्शक अजय फणसेकर यांनी आजच्या भेसूर परिस्थितीचे वास्तववादी वर्णन या चित्रपटात केले आहे. सध्याच्या परिस्थितीला साधर्म्य अशा 'आयुष्य एक वॉर आहे जगण्यासाठीचे आणि जागवण्यासाठीचे'. या संवादाने ट्रेलरची सुरुवात होते. पिढ्यानपिढ्या देशसेवेचे व्रत आचरणात आणणाऱ्या देशपांडेंच्या घरात चित्रपटाची कथा घडते.
निवृत्त लष्कर अधिकारी अभय देशपांडे आपल्या पत्नीसोबत निवृत्तीनंतरचे निवांत आयुष्य जगत असतांनाच समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवून दोन हात करताना दिसत आहेत. मीडियामधून, आजूबाजूच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणावर वृद्ध व्यक्तींवर होणाऱ्या हल्ल्याच्या बातम्या येत असतात. तर दुसरीकडे आजची तरुण पिढी स्वच्छंदी आयुष्य जगण्याच्या नादात दारू, ड्रुग्सच्या आहारी गेल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. अशातच एक अघटित घटना घडून या देशपांडे दाम्पत्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण करते. वरिष्ठ नागरिक आणि आजची तरुण पिढी यांच्यातील नात्याचे भेदक चित्रण या चित्रपटात दाखवले आहे. चैनीचे जीवन जगण्याच्या नादात व्यक्ती कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो याचा प्रत्यय हा चित्रपट पाहताना नक्कीच सर्वांना येईल. या चित्रपटातून आजच्या परिस्थितीला आहे त्या स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न अजय फणसेकर यांनी केला आहे.
माधुरी नागानंद आणि विजयकुमार नारंग निर्मित या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, स्मिता जयकर, सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार हे कलाकार या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका निभावताना दिसणार आहेत. 'सिनियर सिटीझन' या चित्रपटात क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून राजू सावला यांनी काम पहिले आहे. हा सिनेमा येत्या १३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.