Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

... आता 'किंग खान'ही म्हणतोय 'स्माईल प्लीज'

... आता 'किंग खान'ही म्हणतोय 'स्माईल प्लीज'
, शुक्रवार, 28 जून 2019 (09:14 IST)
कधीतरी काहीतरी वाईट होईल, म्हणून आपण आता जगायचं थांबवत नाही ना? जगण्याबाबतचा असा आशादायक दृष्टिकोन देणाऱ्या विक्रम फडणीस लिखित, दिग्दर्शित 'स्माईल प्लीज' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याच्या हस्ते लाँच करण्यात आला. या प्रसंगी शाहरुखच्या हस्ते म्युजिक अल्बमचेही अनावरण करण्यात आले. ‘’विक्रम आणि माझी खूप जुनी मैत्री आहे. विक्रमचा फॅशन डिझायनर ते दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे. मी विक्रमला एकदा म्हणालो एखादा विनोदी चित्रपट बनव. त्यावर त्याचे उत्तर होते, ‘हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. या चित्रपटाशी माझे भावनिक नाते आहे.' चित्रपटचा ट्रेलर बघताना मला याची प्रचिती आलीच. त्याने हा चित्रपट खूप मनापासून बनवला आहे. चित्रपटातील कसलेले कलाकार, उत्कृष्ट पटकथा, त्याला साजेशी गाणी अशी एकंदरच मस्त भट्टी जमून आली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात जागा बनवून चेहऱ्यावर नक्कीच स्माईल आणेल.’’असे उद्गार या वेळी शाहरूख खान याने काढले.      
 
संगीतकार रोहन-रोहन आणि त्यांच्या टीमने धमाकेदार परफॉर्मन्स सादर करत सोहळ्यात अधिकच रंगत आणली. या वेळी प्रिया बापट, उमेश कामत, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, मानसी नाईक, पुष्कर जोग, राहुल पेठे आदी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारआणि मान्यवर उपस्थित होते. 
 
जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना सामोरे जाताना स्वतःला 'स्माईल प्लीज'चा संदेश देत, येणाऱ्या समस्यांचा आत्मविश्वासाने सामना करावा, हे या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे. ट्रेलरवरून हा चित्रपट नात्यातील गुंतागुंत, प्रेम, मैत्री,आयुष्य यावर भाष्य करणारा दिसतोय. या सिनेमात मुक्ता बर्वे ही एक यशस्वी फोटोग्राफर असून ती तिच्या फोटोंमधून व्यक्त होतेय. ललित हा मनमुराद आयुष्य जगणारा, स्पष्ट आणि आशावादी विचारांचा स्रोत असून आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहे. तर प्रसाद ओक कामाला प्राधान्य देणारा दाखवला आहे. या तीन भिन्न व्यक्तिमत्त्वांना जोडणारा हळुवार धागा म्हणजेच 'स्माईल प्लीज'.
 
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित 'स्माईल प्लीज' या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर, सतीश आळेकर, तृप्ती खामकर, वेदश्री महाजन यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपटाची पटकथा विक्रम फडणीस, इरावती कर्णिक यांची आहे. चित्रपटाला रोहन-रोहन यांचे संगीत लाभले असून मंदार चोळकर यांनी समर्पक गीते लिहिली आहेत. तर सुनिधी चौहान, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, रोहन प्रधान, मुग्धा कऱ्हाडे यांनी गाण्यांना स्वरबद्ध केले आहे . यापूर्वी प्रदर्शित झालेले 'श्वास दे' हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक बॉस्को-सिझर यांनी  नृत्यदिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून डीओपीचे काम मिलिंद जोग यांनी पहिले आहे. हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजीवाल्याची कमाल, कोणी दाताडी तर कोणी काळी पाल