दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आता प्रेक्षकांसाठी चित्रपट गृह सुरू झालेत. मनोरंजनाची मोठी पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. मराठी चित्रपटाच्या प्रयोगशीलतेत या दोन वर्षात चांगलीच वाढ झाली. दर्जेदार आणि वैचारिक प्रगल्भता जपणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीत बऱ्याच वर्षांनी एक वेगळा प्रयोग होत आहे. हा प्रयोग म्हणजे ' झोंबिवली' हा आगामी चित्रपट, मोठ्या पडद्यावर येत्या ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकाच्या भेटीला येतोय. आदित्य सरपोतदार याच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाने सज्ज असा चित्रपट सध्या चर्चेत आहे.
चित्रपटाची एकूणच चर्चा बघता चित्रपटातील गाण्याची चर्चा सुद्धा सुरू होती. मराठीतला पहिलाच झोंबी चित्रपटात नेमकी किती आणि कोणती गाणी असणार यावर सगळेच विचार करत असताना आता या विचाराला पूर्णविराम देण्यासाठी 'अंगात आलया' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. प्रशांत मदपूवर यांनी लिहिलेलं आणि रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेलं 'अंगात आलया' हे गाणं रोहन प्रधान याने गायलं आहे. 'अंगात आलया' हे गाणं चित्रपटानुसार झोंबीनी भरलेलं आहे. सगळ्यांना आपल्या तालावर नाचायला लावेल अशा या गाण्यावर अमेय, वैदेही आणि ललित सोबत एक खास पाहुणा नाचताना दिसतो तो म्हणजे सर्वांचा लाडका 'सिद्धार्थ जाधव'. अफाट एनर्जी असलेला सिद्धार्थला या गाण्यावर थिरकताना पाहिल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतात तर या गाण्यात सिद्धार्थला नाचवणारा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार सांगतो, 'सिद्धार्थ माझ्या गेल्या तिन्ही चित्रपटात दिसलाय, तो नेहमीच माझ्या सोबत कलाकृतीत एका लकी चार्म असल्यासारखा असतो. या चित्रपटातील हे गाणं त्याच्यासाठी खास लिहिल्यासारखं वाटत, कारण त्याची ती सकारात्मकता आणि अफाट ऊर्जा. त्याच्या असण्यातच सकारात्मक ऊर्जा सामावलेली आहे . हे गाणं चित्रपटात महत्वाचं आहे आणि त्यासाठी सिध्दार्थला मी विचारल्यावर त्याचा लगेच होकार येणं ही तितकीच महत्वाचं होत. त्याने साकारलेला झोंबी डान्सर हा खरच स्पेशल आहे'. या गाण्याच्या सुरुवातीला विनोदवीर विनायक माळी सुद्धा आपल्याला दिसतो. तरुणांना भावणाऱ्या या गाण्याविषयी विशेष म्हणजे या गाण्यात झोंबी दिसले असून त्यांना अगदीच लग्नाच्या वरातीत नाचताना आपण पाहणार आहोत. या गाण्याच नृत्य दिग्दर्शन रंजू वर्गिस याने केले आहे.