काही दिवसांपूर्वीच 'प्लॅनेट मराठी ओटीटी' ॲपचे 'धकधक गर्ल' माधुरी दिक्षितच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या ॲपला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यावरील वेबसिरीज सर्वांच्या पसंतीस उतरत आहेत. आगामी काळात 'प्लॅनेट मराठी' प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवनवीन वेबसिरीज व सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यापैकीच एक असलेल्या अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, 'चलचित्र कंपनी' निर्मित 'सनी' या सिनेमाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ललित प्रभाकर यात सनीची भूमिका साकारत असून हेमंत ढोमे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे तर अक्षय विलास बर्दापूरकर आणि हेमंत ढोमे हे या सिनेमाचे निर्माते आहेत.
पोस्टरवर आपल्याला निळ्याशार आभाळाखाली 'सनी' खळखळून हसताना दिसतोय. लाल, पिवळा, निळा असे गडद रंग आणि ललितचे खळखळून हसणे. अशा उत्साहाने भरलेल्या या पोस्टरवरूनच कळतेय की, हा सिनेमा काहीतरी सकारात्मक दृष्टिकोन देणारा आहे. या सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून २०२२ मध्ये 'सनी' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'सनी'बद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, "हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे. यातील सनीचे आयुष्य काही प्रमाणात मी स्वतःही जगलो आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा माझ्या खूप जवळची आहे. ललित प्रभाकर या भूमिकेला तो योग्य न्याय देऊन त्यात रंग भरेल याची खात्री आहे आणि अक्षय बर्दापूरकर यांच्यासोबत प्रथमच काम करत असल्याने मी खूप उत्सुकही आहे आणि त्याचा आनंदही आहे.''
या सिनेमाबद्दल 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' हेमंत ढोमे उत्तम नट आहेच. त्याचबरोबर तो दिग्दर्शक म्हणूनही उत्तम आहे. ललित प्रभाकरने आपण उत्कृष्ट अभिनेता असल्याचे अनेक सिनेमांमधून सिद्ध केले आहे. 'प्लॅनेट मराठी' सोबत अनेक कलाकार आणि दिग्दर्शक जोडले गेले आहेत. आमच्या या परिवारात आता हेमंत ढोमे आणि ललित प्रभाकर यांचाही समावेश होतोय याचा आनंद आहे. या दोघांबरोबर एकत्र काम करण्यासाठी मी फार उत्सुक आहे".