Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांना ‘स्वामीभूषण’ राज्य पुरस्कार प्रदान

आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांना ‘स्वामीभूषण’ राज्य पुरस्कार प्रदान
, शनिवार, 20 जुलै 2019 (12:43 IST)
सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याला अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने यंदापासून सुरू करण्यात आलेल्या ‘स्वामीभूषण’ राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुरूपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. त्याचबरोबर ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना देखील ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले आणि अमोलराजे जन्मेंजयराजे भोसले यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, सन्मानचित्र व सन्मानपत्र असे असून राज्यस्तरीय स्वामीभूषण पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे.
 
यावेळी बोलताना स्वप्नील जोशी म्हणाला की ‘परमेश्वराच्या कृपेने, आई वडिलांच्या आशिर्वादामुळे आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आजपर्यंत मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रत्येक पुरस्कार हा मला पाठीवर शाबासकीची थाप आणि खूप आनंद देऊन जातो. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांनी यावर्षीपासून सुरु केलेल्या ‘स्वामीभूषण’ हा राज्यस्तरीय पुरस्कार मला प्रदान करण्यात आला आणि याचा पहिला मानकरी मी आहे याचा मला खूप आनंद आहे’. 
 
तो पुढे म्हणाल की ‘हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे याच कारण असं की, ज्या श्री स्वामी समर्थांचं नाव ऐकून माझा जन्म झाला, ज्या स्वामींच्या आशिर्वादाने इथं पर्यंत पोहोचलो, ज्यांना मी माझ्या गुरुस्थानी मानतो, या पुरस्काराच्या निमित्ताने पुन्हा मला जाणवलं ते खरंच आपल्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे मला जास्त जोमाने काम करण्याचा नवं चैतन्य, नवा हुरूप आला आहे’.
webdunia
‘त्याचबरोबर अजून एका कारणासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की, ज्या व्यासपीठावर माझा सत्कार करण्यात आला त्याच व्यासपीठावर आशाताई भोसले यांना  देखील ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्या मंचावर आशाताई उभ्या आहेत त्याच मंचावर मला पुरस्कार मिळणं हे माझं  भाग्य आहे. त्या निमित्ताने त्यांना भेटता आलं, त्यांना ऐकता आलं, या युगात देव रोज सापडतोच असं नाही पण आशाताईंसारख्या स्त्रीला पाहिल्यावर असं वाटलं, परमेश्वर असाच असेल, सरस्वतीदेवी अशीच असेल आणि हा योग आणि अनुभव मला आज ह्या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाला, हे एवढ्या सगळ्या लोकांचं आशीर्वाद आणि तुमचं प्रेम ह्या सगळ्याबरोबर मी आज हा पुरस्कार स्वीकारतोय’ असेही स्वप्नील जोशी पुढे म्हणाला. 
 
तो पुढे म्हणाला की ‘स्वामीभूषण’ राज्य पुरस्कारासाठी मला योग्य समजलं आणि मला प्रदान करण्यात आला यासाठी मी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले आणि अमोलराजे जन्मेंजयराजे भोसले या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो आणि हा पुरस्कार मला नवी उंची गाठायला आणि नवीन क्षितिज गाठायला प्रेरणा देईल आणि उस्ताह देईल. मी आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो’. 
 
२९ जुलै १९८८ रोजी, गुरूपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना झाली होती. यंदा मंडळाला ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांनी अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांच्या स्मरणार्थ अक्कलकोटनिवासी ब्रह्मांडनायक स्वामीरत्न राष्ट्रीय, स्वामीभूषण राज्यस्तरीय आणि स्वामीसेवक जिल्हास्तरीय पुरस्कार महनीय व्यक्तींना दरवर्षी गुरूपौर्णिमेच्या दिवशी समारंभपूर्वक प्रदान करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हे पुरस्कार दरवर्षी दिले जाणार आहेत. त्यासाठी अन्नछत्र मंडळाने कायमस्वरूपी भरीव आर्थिक तरतूद केल्याचे जन्मेंजयराजे भोसले यांनी सांगितले. 
 
या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पं. ह्दयनाथ मंगेशकर होते. या समितीवर ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, संयोजक अनुषा अय्यर यांचाही समावेश आहे. गुरूपौर्णिमा तथा अन्नछत्र मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी धर्मसंकीर्तन तथा सांस्कृतिक संगीत सोहळ्याचेही आयोजन केले जाते. यात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांसह नामवंत कलावंत मंडळी सहभागी होतात, अशी माहिती जन्मेंजयराजे भोसले यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिशन मंगलमध्ये झळकणार ‘नरेंद्र मोदी’ ?