Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Tamasha Live- 'तमाशा लाईव्ह'मध्ये रंगला बातम्यांचा फड

tamasha live
, सोमवार, 11 जुलै 2022 (15:24 IST)
संगीत… भावना व्यक्त करण्याचे एक उत्तम माध्यम. या संगीतातून जर एखादी कथा पुढे जात असेल तर? संगीतप्रेमींसाठी तर ही एक पर्वणीच ठरेल. असाच संगीत नजराणा घेऊन दिग्दर्शक संजय जाधव सज्ज झाले आहेत. ‘तमाशा लाईव्ह’ची ही म्युझिकल ट्रीट येत्या 15 जुलैपासून संगीतप्रेमींसाठी सादर होणार आहे. याच सांगितिक मैफलीतील आणखी एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'फड लागलाय' असे या गाण्याचे बोल असून 'ब्रेकिंग न्यूज' मिळवण्यासाठीची चाललेली शर्यत या गाण्यात पाहायला मिळत आहे. हे गाणे अमितराज, साजन बेंद्रे आणि वैशाली सामंत यांनी गायले असून याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. 
 
‘तमाशा लाईव्ह’मधील प्रत्येक गाणे वेगळ्या धाटणीचे आहे. प्रत्येक गाण्यात एक घटना आहे, जी कथेला पुढे घेऊन जाणारी आहे. सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवीवर चित्रीत या गाण्यातूनही कथा पुढे जात असून या गाण्यात बातम्यांचा फड रंगला आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे.
 
या गाण्याविषयी गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणतात," 'तमाशा लाईव्ह'ची सर्वच गाणी उत्तम आहेत. मला याचा फार आनंद होत आहे. एक गीतकार म्हणून पहिल्यांदाच मला अशी संधी मिळाली की, एकाच चित्रपटामध्ये शास्त्रीय संगीतापासून रॅपपर्यंत आणि गरब्यापासून पंजाबी गाण्यापर्यंत सर्व प्रकारची गाणी मी या चित्रपटात लिहीली आहेत. चार, पाच चित्रपटातील गाण्यांचा भाव एकाच चित्रपटात आहे. हा एक वेगळाच अनुभव होता.'' 
 
 प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात," हा 'तमाशा लाईव्ह’हा चित्रपट कोणा एकाचा नसून या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचा आहे. दिग्दर्शक, लेखक, कलाकार, संगीत टीम, नृत्य दिग्दर्शक या प्रत्येकाचीच भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे. आपापल्या क्षेत्रात माहीर असलेले कलावंत यात आहेत आणि हे सगळे एकत्र आल्याने हा एक भव्य चित्रपट बनला आहे. हा चित्रपट म्हणजे एक प्रयोग आहे आणि हा प्रयोग संजय जाधव सारखाच दिग्दर्शक यशस्वी करू शकतो. अरविंद जगताप यांचे संवाद त्यात अधिकच भर टाकणारे आहेत. अमितराज आणि पंकज पडघन या दोन्ही नामवंत संगीत दिग्दर्शकांनी एकत्र येऊन 'तमाशा लाईव्ह'मधील गाण्यांना चारचाँद लावले आहेत. ही खरेच एक म्युझिकल ट्रीट आहे.'' 
 
एटीएट पिक्चर्स प्रस्तुत, अक्षय बर्दापूरकर निर्मित 'तमाशा लाईव्ह' सहनिर्माते सौम्या विळेकर (प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी), माऊली प्रॉडक्शन्स, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर व अजय वासुदेव उपर्वात असून चित्रपटाची कथा मनिष कदम यांची आहे. तर अरविंद जगताप यांचे संवाद लाभले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'प्लॅनेट मराठी'वर लवकरच... 'मी पुन्हा येईन '!