Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॅलेंटाईन डेला प्रत्येकाचं मन गुन गुन'णार : घर बंदूक बिरयानीतील पहिलं प्रेमगीत प्रदर्शित

ghar banduk biryani
, मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (09:22 IST)
यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला प्रेम अधिकच बहरणार आहे. कारण झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत 'घर बंदूक बिरयानी' या नव्या आगामी चित्रपटातील प्रेमाची चाहूल देणार पहिलं 'गुन गुन' हे नवंकोरं प्रेमगीत व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांनी गायलेल्या या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे तर गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे आहेत. 'गुन गुन' या प्रेमगीताच्या माध्यमातून आकाश ठोसर आणि नवा चेहरा सायली पाटील या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज आपल्याला या गाण्यातून दिसतोय.
 
संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात, "नागराज मंजुळे यांच्या सिनेमातील रोमँटिक गाणी ही नेहमीच मनाला भिडणारी असतात. गाण्याची प्रत्येक फ्रेम सुंदर असते. एका अनोख्या पद्धतीने गाण्यांचे चित्रीकरण केले जाते, जे नजरेला सुखावणारे असते. त्यामुळे त्या गाण्याच्या शब्दांना अधिक श्रवणीय करण्याचा मी प्रयत्न केला आहे. प्रेमाची एक वेगळीच गंमत त्यांच्या गाण्यात अनुभवायला मिळते. प्रेमात एक वेगळीच जादू असते, ती जादू पुन्हा एकदा आपल्याला या 'गुन गुन' या प्रेमगीतातून अनुभवता येणार आहे.''
 
नागराज पोपटराव मंजुळे म्हणतात, ''ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी या चित्रपटातील संगीतासाठी मागील चार वर्षांपासून प्रचंड मेहनत घेतली आहे. जीव ओतून काम केलं आहे. मला असं वाटतं, कोणत्याही चित्रपटाचा संगीत हा आत्मा असतो. ज्या गोष्टी कथेतून सांगता येत नाही त्या संगीतातून व्यक्त होतात आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी मनापासून केला आहे. मला खात्री आहे, प्रेक्षक हे गाणं नक्कीच गुणगुणतील.''
 
'घर बंदूक बिरयानी'चा टिझर पाहून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता लागली होती. त्यातच आता हे नवीन गाणं आल्याने या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 'घर बंदूक बिरयाणी' हा चित्रपट ७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॅलेंटाईन वीकमध्ये DDLJ पुन्हा हिट झाला