Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ

अजिंक्य योद्धा'चा भव्य शुभारंभ
, सोमवार, 21 जानेवारी 2019 (09:56 IST)
पहिल्याच प्रयोगाला हजारो प्रेक्षकांची उपस्थिती 
 
हिंदू साम्राज्याचा ध्यास घेऊन कायमच अपराजित राहिलेले सेनानायक, ज्यांनी युगपुरुष शिवाजी महाराजांचे हिंदू साम्राज्य प्रस्थापित करण्याचे स्वप्न बऱ्याच अंशी सत्यात उतरवले. दिल्लीत भगवा फडकावणारे पहिले मराठी सेनानी... शक्ती आणि बुद्धीचा अद्वितीय संगम म्हणजे बाजीराव पेशवे. त्यांच्या जीवनावर आधारित 'अजिंक्य योद्धा - श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ' या महानाट्याचा भव्य शुभारंभ अंधेरी येथील होली फॅमिली पटांगणात नुकताच झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे अध्यक्ष ॲड आशिष शेलार होते. या वेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अमित साटम, गायक नंदेश उमप, आदर्श शिंदे आदींची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. तर या खास प्रयोगासाठी  ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी सपत्नीक हजेरी लावली होती. या महानाट्याचे आयोजन केसरबेन मुरजी पटेल यांनी केले होते. अजिंक्य योद्ध्याचा इतिहास आणि कीर्ती अनुभवण्यासाठी या वेळी हजारोंनी रसिकवर्ग जमला होता. 
webdunia
युद्धनीतीतील बारकावे, गनिमी कावे, शत्रूला मोक्याच्या ठिकाणी आणून पराजित करणे ही बाजीराव पेशवेंची वैशिष्ट्ये या महानाट्यात अचूक टिपण्यात आली आहेत. १०० फूट लांबी, रुंदी असलेला भव्य- दिव्य असा रंगमंच, १३० कलाकार, उत्कृष्ट ध्वनी नियोजन, नेपथ्य, रंगसंगती, पेहराव या सर्वच गोष्टी अतिशय भव्य स्वरूपात आहेत. या नाटकाची रंगत अधिकच वाढली आहे, ती कलाकारांच्या दमदार अभिनयाने. या महानाट्यात बाजीराव पेशवेंची भूमिका गष्मीर महाजनी याने साकारली असून काशीबाईची भूमिका दीप्ती भागवत तर मस्तानीची भूमिका अर्चना सामंत हिने साकारली आहे.
webdunia
संजय पांडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या महानाटकाची निर्मिती पंजाब टॉकीजने केली असून दिग्दर्शन वरुणा मदनलाल राणा यांनी केले आहे. प्रताप गंगावणे लिखित या महानाट्याच्या कार्यकारी निर्मात्याची व सहाय्यक दिग्दर्शनाही धुरा अभय सोडये यांनी सांभाळली आहे. तर योगेश मोरे, कृणाल मुळये, रुपेश परब सहाय्यक आहेत. संगीत दिग्दर्शन आदी रामचंद्र यांचे असून आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, नंदेश उमप, वैशाली माडे, आदी रामचंद्र यांनी गाणी गायली आहेत. पार्श्वसंगीत व संगीत संयोजन विनीत देशपांडे यांचे असून नरेंद्र पंडित यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. नाटकाच्या प्रकाशयोजनेची जबाबदारी भूषण देसाई यांनी सांभाळली असून वेशभूषा पूर्णिमा ओक यांची आहे. नेपथ्याचे कलादिग्दर्शन आबीद शेख यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंगनाची करणी सेनेला चेतावणी, मी सुद्धा राजपूत आहे, नष्ट करून टाकीन...