मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांवर आपली मोहोर उमटवणारे लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे, लवकरच एक नवंकोरं नाटक घेऊन मराठी प्रेक्षकांसमोर येत आहे. 'वाजले कि बारा!’असे या नाटकाचे नाव असून, बाॅलीवूड अभिनेता शर्मन जोशीच्या शर्मन जोशी प्रॉडक्शन प्रस्तुत आणि स्वामी क्रिएशन निर्मित सादर होत असलेल्या या नाटकाचा, महाराष्ट्र दिनानिमित्ताने सिद्धिविनायकाच्या चरणी श्रीगणेशा करण्यात आला. केदार शिंदे दिग्दर्शित हे नाटक 'द प्ले दॅट गोज राँग' या वेस्टएन्ड आणि ब्रॉडवे म्हणजेच, लंडन अमेरिकेत गाजलेल्या नाटकाचे अधिकृत रिमेक असल्याचं सांगितलं जात आहे.
जुलै-ऑगस्टदरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेल्या या नाटकाद्वारे शर्मन जोशी प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून मराठी नाट्यसृष्टीत आपलं पहिलं पाऊल टाकत आहे.
'द प्ले दॅट गोज राँग' हे नाटक वेस्टएन्ड व ब्रॉडवे म्हणजेच लंडन आणि अमेरिकेत सुपरहिट चालत आहे. हे नाटक केदार - शर्मन जोडीने गुजराती आणि इंग्रजी भाषेत भारतात सादर करण्याचे धाडस यापूर्वी केले होते. विशेष म्हणजे, 'द प्ले दॅट गोज राँग' च्या ह्या रिमेकला भारतीय प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ह्या नाटकाचा मराठी रिमेक असलेलं 'वाजले कि बारा!’हे नाटक मराठी प्रेक्षकांनादेखील आवडेल, याची खात्री ह्या दोघांना आहे.
केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेली 'तू तू मी मी', 'सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदर पंत', 'गेला उडत', 'सौजन्याची ऐशी तैशी' यांसारखी दर्जेदार नाटकं मराठी रंगभूमीवर गाजली. मात्र त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा हिंदी आणि गुजराती नाटकाकडे वळवला होता. 'वाजले कि बारा!’च्या निमित्ताने केदार शिंदे तब्बल तीन वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे परतले आहेत.
केदार शिंदे यांनी 'सही रे सही' हे नाटक शर्मनच्या सोबतीने 'राजू राजा राम और मैं' या रिमेकद्वारे हिंदी रंगभूमीवर आणलं होतं. गुजराती, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमीवर सुपरहीट ठरलेली केदार-शर्मनची जोडी, आता मराठी रंगभूमीवर धम्माल करण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे 'द प्ले दॅट गोज राँग' चे मराठी व्हर्जन कसं असेल, याची उत्सुकता नाट्यरसिकांना लागली नसेल तर नवलच !