हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा'ला जगभरातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच 'झिम्मा २'ची घोषणा करण्यात आली. तेव्हापासूनच या चित्रपटात काय पाहायला मिळणार, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, 'झिम्मा २'च्या टीमने नुकताच जागतिक महिला दिन साजरा केला. या वेळी सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, इरावती कर्णिक, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, हेमंत ढोमे आणि निर्माते आनंद एल. राय. उपस्थित होते.
'झिम्मा'ची कथा ही सात स्त्रियांवर आधारित होती, ज्या वेगवेगळ्या वयोगटातील आणि सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या होत्या. त्या एकत्र येऊन इंग्लंडला सहलीला जातात आणि तिथेच त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा शोध लागतो.
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “झिम्माच्या प्रतिभावान स्टारकास्टसोबत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना मला खूप आनंद होत आहे. पहिला भाग प्रचंड यशस्वी झाला. दुसऱ्या भागासाठी, आमच्यासोबत आनंद एल. राय जोडले गेले आहेत आणि मला खात्री आहे की, 'झिम्मा२' लाही भरभरून प्रेम मिळेल.”
निर्माते आनंद एल. राय म्हणतात, ''सुपर टॅलेंटेड झिम्मातल्या महिलांना कलाकारांना भेटण्यासाठी महिला दिनापेक्षा चांगला दिवस कोणता असूच शकत नाही. पहिला भाग २०२१ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता आणि मी प्रादेशिक सिनेमाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहे.”
'झिम्मा'ची निर्माती क्षिती जोग म्हणते, "सर्वात प्रतिभावान आणि बहुमुखी महिलांसोबत हा खास दिवस साजरा करणे खूप आनंददायी आहे. दुसरा भाग सर्वांसाठी आनंददायी असेल."
'झिम्मा २'चे दिग्दर्शन हेमंत ढोमे असून इरावती कर्णिक यांनी लेखन केले आहे. आनंद एल. राय यांच्या कलर यलो प्रोडक्शन आणि क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी यांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी आणि अजिंक्य ढमाळ आहेत.