Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाटकाचा प्रयोग सुरु, नाट्यगृहात एसीच बंद, नाशिकमध्ये प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त

mahakavi kalidas
, मंगळवार, 16 मे 2023 (17:31 IST)
नाशिक शहरातील कालिदास कलामंदिरामध्ये नेहमीच नाटकांचे प्रयोग सुरु असतात. मात्र अनेकदा काही तांत्रिक कारणास्तव प्रेक्षकांसह नाटक कलाकारानंही मनस्ताप सहन करावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच सिनेअभिनेते वैभव मांगले आणि अभिनेत्री निर्मिती सावंत अभिनित ‘संज्या छाया’ या नाट्यप्रयोगावेळी रविवारी सायंकाळी कालिदास नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त करत नाराजीही व्यक्त केली.
 
नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरातील वातानुकूलन यंत्रणा एप्रिलच्या अखेरपासून वारंवार बंद पडत असल्याचे प्रसंग सातत्याने घडत आहेत. रविवारी संध्याकाळी “संध्या छाया” या विनोदी नाटकाच्या प्रयोगाच्या पहिल्याच अंकात एसी बंद पडल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. यावेळी उपस्थित नाटकातील मुख्य कलाकार वैभव मांगले यांनीही या ढिसाळ कारभाराबाबत कठोर शब्दात नाराजी व्यक्त करत प्रेक्षकांना थांबण्याची विनंती केल्यानंतर उकाडा सहन करत प्रयोग पार पडला.
 
तर यावेळी नाट्यगृहाची दारे उघडे ठेवून नाट्यप्रयोग पाहण्याची वेळ प्रेक्षकांवर आली. मात्र तरीदेखील प्रेक्षकांना उकाड्यातच संपूर्ण प्रयोग पाहावा लागला तर काही प्रेक्षकांनी मध्यंतरातच नाट्यगृहातून काढता पाय घेतला.
 
अभिनेते वैभव मांगले अभिनित संध्या छाया नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी रविवारी सायंकाळी प्रेक्षकांनी कालिदास कलामंदिरात गर्दी केली. मात्र, वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने आणि तापमानाचा पारा वाढल्याने प्रेक्षक हैराण झाले. नाट्यगृहाची दारे बंद असल्याने आणि वातानुकूलित यंत्रणा बंद अवस्थेत असल्याने प्रेक्षकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
 
इंटरवल सुरु होताच सिनेअभिनेते वैभव मांगले यांच्यासह कलावंतांनी प्रेक्षकांसमोर येत दिलगिरी व्यक्त केली. आम्हालाही नाट्यगृहात एससी सुरु नसल्याचे माहिती नव्हते. प्रयोग रद्द झाला तरी चालेल पण आधी एसी चालू की बंद याची शहानिशा करा, मगच तिकीट काढा, असे मांगले यांनी प्रेक्षकांना सांगितले. मात्र काही प्रेक्षकांनी त्याही स्थितीत नाट्यगृहात थांबत नाटकाचा आनंद घेतला.
 
दरम्यान अभिनेते वैभव मांगले यांनी अशा प्रकारच्या ढिसाळ कारभाराबाबत कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली. कलाकारांना प्रचंड उकाड्यात नाटक सादर करण्याची तर प्रेक्षकांना उकाडा सहन करत थांबण्याची वेळ येणे अत्यंत अयोग्य आहे. एसी बंदच राहिल्यास भविष्यात इथे नाटक करावे की नाही, त्याबाबतही विचार करावा लागेल, तसेच पुढील दोन नाटके रद करीत असल्याचे नमूद केले. मात्र, आम्हीदेखील मुंबईहून नाटक सादरीकरणासाठी इतक्या लांब आलो असल्याने प्रेक्षकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर सोशल मीडियावर पोस्ट करत कालिदास कलामंदिराच्या ढिसाळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.
 
कोरोना काळात नूतनीकरण करण्यात आलेल्या कालिदास कलामंदिरातील वातानुकूलन यंत्रणा सांभाळण्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, गत तीन ते चार महिन्यांपासून संबंधित कंत्राटदाराला महापालिकेकडून निर्धारित दरानुसार देयकेच मिळाली नसल्याने गत महिन्यातच कंत्राटदारासह त्याचे कर्मचारी कालिदासमध्ये फिरकेनासे झाले आहेत. रविवारी संज्या छाया धम्माल विनोदी नाटकाच्या प्रारंभीच एसी पुन्हा बंद पडले. प्रेक्षकांनी त्याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर कालिदासमध्ये उपस्थित मनपा कर्मचारी हे नॉन टेक्निकल असल्याने त्यांना केवळ बटण चालू बंद करण्याशिवाय यंत्रणेची काहीच माहिती नव्हती.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वानखेडेंनी शाहरुखकडे मागितली होती 25 कोटींची खंडणी, सीबीआयचा आरोप