राम गणेश गडकरी लिखित 'एकच प्याला' हे अजरामर संगीतनाट्य सर्वश्रुत आहे. शंभरवर्षापुर्वीच्या या नाटकाचा नाशिककरांना अनुभव घेता येणार आहे. रंगशारदा निर्मित आणि विजय गोखले दिग्दर्शित 'संगीत एकच प्याला' नव्या ढंगात आज, दि ६ जुलै रोजी, संध्याकाळी ५.०० वाजता, नाशिक येथील कालिदास कलामंदिर येथे सादर होत आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय आजही तितकाच गंभीर असून, याच विषयावर भाष्य करणाऱ्या या नाटकाचा संपूर्ण महाराष्ट्रात दौरा असून, पहिल्यांदाच नाशिकमध्ये या नाटकाचा प्रयोग होणार आहे. ‘संगीत एकच प्याला’ या नाटकात अंशुमन विचारे, संग्राम समेळ आणि संपदा माने या आजच्या कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.
रंगभूमीवर १०० वर्षे राज्य गाजवणारे हे नाटक शताब्दी वर्षपूर्तीचे औचित्य साधून, पुन्हा एकदा रंगभूमीवर सादर झालेल्या या नाटकाला संपूर्ण महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळत आहे. या नाटकातील सुधाकरच्या भूमिकेत संग्राम समेळ, सिंधूच्या भूमिकेत संपदा माने व ‘तळीराम’ची भूमिका अंशुमन विचारे साकारत आहे. यांच्यासह शुभांगी भुजबळ, शुभम जोशी, मकरंद पाध्ये, शशिकांत दळवी, विजय सूर्यवंशी, दीपक गोडबोले, विक्रम दगडे, रोहन सुर्वे, प्रवीण दळवी असे गुणी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.