Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्री मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचे आजोबा ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचे निधन

mrunmayee deshpande
, शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (11:43 IST)
अभिनेत्री गौतमी आणि मृण्मयी देशपांडे यांचे आजोबा आणि ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचे  वृद्धापकाळाने निधन झाले. गौतमी देशपांडे ने सोशल मीडियावर ही दुःखद बातमी दिली. गौतमीने आजोबांसाठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

तिने लिहिले आहे, प्रिय आजोबा, पत्रास कारण की, आज तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला ! आज माझ्या आजोबांची, आईच्या मामाचा बाबांची, आज्जीच्या प्रेमळ नवऱ्याची, उत्तम भावाची, आदर्श मुलाची अशा सगळया भूमिका असलेलं तुमच तीन अंकी नाटक इथेच संपलं.....

पण आजोबा काय सांगू तुम्हाला.... इतक्या कमाल वठवल्यात तुम्ही सगळ्या भूमिका !”“प्रत्येक भूमिकेच वेगळेपण जपलं तुम्ही. कथानक पण काय सुंदर आणि नाट्यमय होतं हो नाटकाचं.... सुरूवात झाली ती स्वतःचे वडील जाण्यापासून.... नंतर आईचा पुन:र्विवाह.... नवीन कुटुंबामध्ये प्रवेश.... नवीन भावांचं सख्ख्यांपेक्षा जास्त प्रेम.... तुमच्यासारख्या हँडसम नायकाला साजेल अशा सुंदर नायिकेचा आयुष्यात प्रवेश..... नायकाचं नाटकाविषयाचं प्रेम, लग्न, दोन गोड मुलांचा जन्म, सारंच कथानक एखाद्या फिल्मला लाजवेल असं....

आजोबा, तुमचे एक एक प्रवेश पण काय लाजवाब  ... "एखाद्याचं नशीब" म्हणत एक सुंदर नायिका आयुष्यात आली आणि  ...नकळत पणे मनाचे धागे जुळत गेले . मग " याला जीवन ऐसे नाव" म्हणत तुम्ही पुढे गेलात ... "अशी पाखरे इति " म्हणत संसार सुरु झाला .... "नाटककराच्या शोधात तुम्ही सहा पात्र" फिरत गेलात ....पुढे "शेहेनशाह" बनून तुम्ही "नटसम्राट" असल्याचा दाखवून दिलंत .... दुःखांकडे पाठ फिरवत हसतमुखानं "तो मी नव्हेच " म्हणत राहीलात .... असे आयुष्याचे खरे खुरे "किमयागार " ठरलात ..... "चाणक्य " बुद्धीने सतत आरोग्यक्षेत्राला योगदान देत आलात .... तीन अंक कुठे कसे संपले कळलंच नाही ....."

गौतमी लिहिते "प्रेक्षक प्रत्येक नाटकातून काही ना काही घेऊन जातो ... यातून काय बरोबर घेऊन जाऊ अन काय नको असा वाटतंय .... त्यामुळे हे नाटकच आता सोबत ठेवणारोत आयुष्यभर ....
तुम्ही आता मात्र शांत व्हा ....दमला असाल तुम्ही .... आता खऱ्या अर्थानी पडदा पडला आहे ...नाटक संपल्यानंतर तो तुमच्यातला नट आता शांत आणि समाधानी आहे ....
तुमच्यातला हा 'नट " आम्ही आमच्यात आयुष्यभर जागा ठेवू .... अन तुमच्या 10% तरी चांगुलपणा आणि सकारात्मकता आमच्यात यावी अशी प्रार्थना करू ....
तुमच्याच एका प्रवेशातल हे वाक्य ....झालेत बहू ,असतील बहू , होतील बहू ,पण या सम हा ....!!
रंगदेवतेला वंदन करून हा तीन अंकी प्रवेशाचा पडदा पडला असं जाहीर करते....अन त्या नटसम्राटास पुन्हा एकदा वंदन करते ....तुमची नात आणि तुमची फॅन.. गौतमी"
 
गौतमीने आपल्या या भावनिक पोस्टांतून आजोबा आणि नातीचे हे नाते कसे होते हे सांगितले आहे. तिची ही भावुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे हे 1953 पासून मराठी रंगभूमीशी जुडले. त्यांनी गौतमी देशपांडे अभिनित मालिका 'माझा होशील ना 'या मालिकेत पाहुणे कलाकार म्हणून भूमिका साकारली होती. 
आजोबांच्या निधनामुळे गौतमी आणि मृण्मयी देशपांडे या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
 
 


Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Parineeti Raghav Wedding: शाही बोटीत राघव परिणीतीला घ्यायला जाणार