Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'एकदा काय झालं’ या चित्रपटात खलनायक का नाही? दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले…

salil kulkarni
, सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (08:28 IST)
मुलांसाठीच्या मराठीतल्या अनेक कथा, “एकदा काय झालं..’ या उद्गारांनी सुरु होतात. संगीतकार,गायक आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या चित्रपटाचे हेच शीर्षक देखील, आपल्यासमोर अशीच एक सुंदर कथा सादर करते. फरक इतकाच, की ही कथा केवळ लहान मुलांसाठी नाही, तर मोठ्ठ्या माणसांसाठी पण आहे.
 
53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला चित्रपट, “एकदा काय झालं” ही अशा एका व्यक्तीची कथा आहे, जो एक वेगळी शाळा चालवत असतो. त्याला असा विश्वास असतो, की कथेच्या माध्यमातून आपण जगातला कोणताही विचार, इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, मग तो विचार कितीही मोठा असू देत किंवा लहान. त्याच्या या शाळेत- जिथे त्याचा मुलगाही शिकत असतो- तो सगळे विषय कथेच्या माध्यमातूनच शिकवत असतो. जेव्हा त्याच्या आयुष्यात एक अत्यंत कठीण प्रसंग येतो, आणि त्याला त्याविषयी आपल्या मुलाला सांगायचं असतं, तेव्हाही तो, कथेच्या माध्यमातून संवाद साधण्याच्या आपल्या तत्वज्ञानाचाच वापर करतो.
 
इफ्फीच्या ‘टेबल टॉक्स’ या पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या संवाद सत्रात, माध्यमे आणि महोत्सवातील प्रतिनिधींना या चित्रपटाविषयी माहिती देतांना डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, ‘आपण प्रौढ लोक अनेकदा असे गृहीत धरतो की त्यांनी मुलांना काही सांगितलं तर मुलं त्यावर अमुकतमुक पद्धतीनं प्रतिक्रिया देतील. पण एखादी अवघड परिस्थिती किंवा प्रसंग कसा हाताळायचा हे मोठ्या माणसांनाच कठीण जात असेल, तर अशावेळी त्या परिस्थितीविषयी मुलांना कल्पना देणं आणखी अवघड होऊन बसतं. या चित्रपटातून, मुलांना चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी कशा वेगळ्या पद्धतीने, हळुवारपणे सांगता येतील, हे उलगडून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. यावर मुलं नेमकी कशी प्रतिक्रिया देतील,असलं काहीही गृहीत न धरता, गोष्टी त्यांना सांगण्याचा मार्ग यातून दाखवला आहे.”
 
आपला हा चित्रपट, 53 व्या इफ्फीमधे निवडला गेल्याबद्दल, डॉ सलील कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त केला. हा चित्रपट बघून प्रेक्षकांच्या ओलावलेल्या डोळ्यांकडे पहिल्यावर मन हेलावून गेले, असे ते म्हणाले. लता मंगेशकर यांच्यासोबत गाणं रेकॉर्ड करतांना त्यांना अनुभव आला, तोच अनुभव इथे घेतल्याचं सांगत या दोन्ही प्रसंगी, आपलं मन भरून आल्याचं त्यांनी सांगितलं.
 
स्वतः संगीतकारही, असलेल्या डॉ कुलकर्णी यांनी या चित्रपटाला संगीत देण्याचा आपला अनुभव यावेळी शेअर केला. ते म्हणाले, की ही गाणी कशी चित्रित होणार आहेत, हे त्यांनाच व्यवस्थित माहिती होतं त्यामुळे, त्यांचं संगीत दिग्दर्शन करणे अतिशय कठीण काम होतं. “कारण, जेव्हा इतर लोक ते गाणं चित्रित करतात, तेव्हा त्यात तुमच्यासाठी काहीतरी विस्मयकारक असतं-कधी खूप छान अनुभव येतो, तर कधी अपेक्षेपेक्षा वेगळा!” असे ते पुढे म्हणाले.
 
चित्रपट निर्मितीविषयीचा आपला दृष्टिकोन स्पष्ट करतांना सलील कुलकर्णी म्हणाले, की मी असं ठरवलं आहे, की माझ्या चित्रपटात कोणी खलनायक नसेल. “आपल्याला आधीच खूप समस्या आहे; त्यामुळे आपल्याला वाईट लोकांची गरज नाही. परिस्थितीच कधीकधी वाईट होत असते, तेवढं पुरेसं आहे.” असं मत त्यांनी वव्यक्त केलं.
 
आपल्या चित्रपटासाठी कलाकारांची निवड कशी केली, हे सांगतांना, सलील कुलकर्णी म्हणाले, की त्यांनी, लहान मुलांच्या भूमिकेसाठी निवड करतांना 1700 पेक्षा जास्त मुलांची ऑडीशन घेतली, आणि, त्यानंतर अर्जुन पूर्णपात्रेची निवड केली, त्याने या चित्रपटात चिंतन ची भूमिका साकारली आहे. सुमित राघवनने यात चिंतनच्या वडिलांची तर उर्मिला कानेटकर-कोठारे यांनी आईची भूमिका केली आहे.
आपल्या या भूमिकेविषयी बोलतांना सुमित राघवन ने सांगितलं की जेव्हा सलील कुलकर्णी यांनी त्यांना ही पटकथा ऐकवली, तेव्हा लगेचच त्यांनी या भूमिकेसाठी होकार दिला, कारण, अशा इतक्या उत्तम पटकथा अभिनेत्यांच्या वाट्याला नेहमी नेहमी येत नाहीत.
 
एक अभिनेता म्हणून, भूमिका निवडण्याचा आपला विचार सांगतांना सुमित राघवन म्हणाले, की जरी आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता असतांनाही, उत्तम संहिता किंवा उत्तम भूमिकेसाठी, वाट बघणे मला आवडतं. “मला नेहमीच असं वाटत आलं आहे, की अभिनेत्याच्या कारकीर्दीचा काळ मर्यादित असतो. पण आपल्या कामासाठी संयम ठेवून वाट बघण्यावर माझा विश्वास आहे. आणि जेव्हा अशा उत्तम चित्रपटात काम करण्याची संधी मिळते, तेव्हा हा विश्वास अधिकच दृढ होतो.”
 
मुलांसाठी डॉ सलील कुलकर्णी करत असलेल्या कामाचं कौतूक करत, सुमित राघवन म्हणाले, “ सलीलला मुलांची नाडी अचूक ओळखता येते. अनेक वर्षांपासून तो मुलांसोबत काम करतो आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल, सुमित यांनी सांगितलं की, “चित्रपटाचा विषय अत्यंत सार्वत्रिक आहे त्यामुळे कोणीही स्वतःला त्या व्यक्तिरेखांमध्ये बघू शकतो. त्यात चित्रपटातले सगळे कलाकार अतिशय उत्तम असल्याने चित्रपट उत्तम बनला आहे. या चित्रपटाने, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षक परीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.” 53 व्या इफफीमध्ये, भारतीय पानोरमा विभागात, ‘एकदा काय झालं’ चित्रपट दाखवला गेला.
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Marathi Joke :दिल्लीला अमेरिकेची राजधानी करा