जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रार्थना बेहेरेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मितवा, कॉफी आणि बरचं काही, मि अँड मिसेस सदाचारी या सिनेमातून तिची अभिनय संपन्नता पाहायला मिळाली. अभिनयाचे विविध पैलू अनेक सिनेमातून प्रेक्षकांसामोर मांडणा-या प्रार्थनाला 'मितवा' या सिनेमासाठी शासनाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार तसेच मिक्ता, तर संस्कृती कलादर्पण पुरस्कार , सह्याद्रीचा फ्रेश फेस ऑफ दी इअर तसेच स्टार प्रवाहचा लक्स फ्रेश फेस ऑफ दी इयर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हीच गुणी अभिनेत्री आपल्याला हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून नावारूपाला आलेली प्रार्थना सध्या मराठी सिनेसृष्टीतली उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या मालिकेनंतर प्रार्थनाच्या फिल्मी करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. प्रार्थना आता शर्मन जोशीसोबत हिंदीत दमदार पदार्पण करते आहे. 'हेट स्टोरी २' तसेच 'हेट स्टोरी ३' यासारखे हिट सिनेमे देणारे विशाल पांड्या यांच्या आगामी 'वजह तुम हो' या हिंदी सिनेमात प्रार्थना प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. टी सिरीजची निर्मिती असणाऱ्या या सिनेमाचे चित्रीकरण येत्या जूनपासून सुरु होणार आहे. हिंदी सिनेमात प्रार्थनाला पाहायला तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.