विक्रम गोखलेही झाले दिग्दर्शक
गेली जवळ-जवळ तीन दशके हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच रंगमंचावर दर्जेदार नाटकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना गुंगवून सोडणारे अभिनेता विक्रम गोखले आता दिग्दर्शकाच्याही भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. विक्रम गोखले द्वारा दिग्दर्शित आघात चित्रपट २४ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विक्रम गोखले यांनी वेबदुनियाशी मारलेल्या गप्पांचा सारांश-इतक्या उशीरा दिग्दर्शक व्हावे असे का ठरवले विचारता विक्रम गोखले यांनी सांगितले, मी दिग्दर्शक व्हावे अशी इच्छा आत्ताच नव्हे तर १९७५ पासूनच काही जण व्यक्त करीत होते. मात्र उगीचच दिग्दर्शकाचा छाप लावण्यासाठी दिग्दर्शक होण्याची माझी इच्छा नव्हती. अधे - मधे नेहमी मला दिग्दर्शनाच्या ऑफर येत होत्या परंतु एकही विषय मला असा वाटला नाही ज्याच्यासाठी दिग्दर्शकाची कमान हाती घ्यावी. मात्र जेव्हा डॉ. नीतिन लवंगारे यांनी ऐकवली तेव्हा मला ती खूपच आवडली. या कथेवर काहीतरी करावे असे मला वाटू लागले. या कथेसंदर्भात जेव्हा मी माझा मित्र मोहन दामले याला ऐकवली तेव्हा त्यालाही ती खूप आवडली. मोहनने लेकिन चित्रपट केला होता तेव्हापासून आमची मैत्री आहे. लेकिनच्या वेळेसच त्याने सांगितले होते की जेव्हा तो चित्रपट निर्माण करील तेव्हा त्याचे दिग्दर्शन मीच केले पाहिजे. जवळ-जवळ २० वर्षापूर्वी आम्ही हा अलिखित करार केला होता जो आता पूर्ण होत आहे. उत्कृष्ट कथेमुळेच मी दिग्दर्शक व्हायला तयार झालो.अभिनेत्यावर दिग्दर्शकाने मात केली कि अभिनेत्याने दिग्दर्शकावर विचारता विक्रम गोखले म्हणाले, असे काही म्हणता येणार नाही. मला ठाऊक आहे कि प्रत्येक अभिनेता स्वतःला श्रेष्ठ अभिनेता समजत असतो. कोणीही यापासून वाचलेला नाही. परंतु सेटवर जेव्हा मी माझी भूमिका करीत असे तेव्हा चित्रिकरणाअगोदर मी त्याचे व्हीडियो रेकॉर्डिंग करीत असे. व्हीडियो रेकॉडिँग पाहून नंतरच मी चित्रिकरण करीत असे. त्यामुळे अभिनेत्याने दिग्दर्शकावर मात केली वा दिग्दर्शकाने अभिनेत्यावर मात केली असे म्हणण्याऐवजी मी असे म्हणेन की दोघांनी एकमेकांना मदत केली आहे.
चित्रपटाच्या कथानकाबाबत विचारता विक्रम गोखले यांनी सांगितले, आघातमध्ये आजच्या वैद्यकिय क्षेत्रात चाललेल्या अपप्रवृत्ती आणि या अपप्रवृत्तींशी एकाकी लढत देणार्या एका झुंजार डॉक्टर तरूणीची कथा मांडण्यात आली आहे. या अपप्रवृत्तींचा बिमोड करताना तिला किती अडचणींना, संकटांना सामारे जावं लागतं, यात तिला कुणाच सहकार्य मिळतं. ती आपल्या कामात यश प्राप्त करते का इत्यादि प्रश्नांची उत्तरे यात प्रेक्षकांना मिळतील. चित्रपटाचे कथानक असे आहे जे पाहाताना प्रत्येक प्रेक्षकाला वाटेल की ही आपलीच कहानी आहे. हा चित्रपट अत्यंत उत्कृष्ट झाला आहे यात चित्रपटातील कलाकारांचा खूप मोठा वाटा आहे. छोट्या-छोट्या भूमिकांसाठीही मी मातब्बर अभिनेते घेतले आहेत. त्यामुळे चित्रपट यशस्वी झाला तर त्याचे संपूर्ण श्रेय कथानकाबरोरच कलाकारांना दिले पाहिजे. कलाकारांकडून काम करवून घेताना मी त्यांना हेच सांगितले होते कि मी कसे करून दाखवते इकडे लक्ष न देता मला काय हवे त्याकडे लक्ष द्या त्यामुळेच मुक्ता बर्वेपासून डॉ. अमोल कोल्हे, मनोज जोशी आणि किरणकुमार यांच्यापर्यंत सगळ्यांनी उत्कृष्टरित्या भूमिका साकारल्या आहेत.चित्रपटात तुम्ही प्रमुख भूमिका साकारली आहे. ही तुम्हीच साकारावी असे का वाटले विचारता विक्रम गोखले म्हणाले, कारण या भूमिकेसाठी मला दुसरा नटच मिळाला नाही. ही भूमिका फक्त श्रीराम लागूच साकार करू शकले असते परंतु त्यांचे वय या भूमिकेसाठी खूपच जास्त होते. जर ते ५० वर्षांचे असते तर ही भूमिका मी त्यांनाच दिली असती. पुढेही दिग्दर्शन करण्याची योजना आहे का विचारता विक्रम गोखले म्हणाले. माझी इच्छा तर नेहमीच असते परंतु चांगले कथानक मिळाले तरच मी याचा विचार करीन.चित्रपट जानेवारीमध्ये तयार झाला असूनही प्रदर्शित व्हायला एक वर्ष का लागले विचारता विक्रम गोखले म्हणाले, चित्रपटाचे शूटिंग जानेवारीमध्ये झाले. त्यानंतर पोस्ट प्रोडक्शन आणि अन्य कामामध्ये वेळ लागला. आम्हाला डॉक्यूमेंट्री वा आर्ट फिल्म बनवायची नव्हती तर एक वेगळा विषय मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणायचा होता. चित्रपट तयार झाल्यावर आम्ही तो अनेक डॉक्टर आणि अन्य लोकांना दाखवला. त्यांच्याकडून सूचना घेतल्या. आणि आता जेव्हा आम्हाला वाटले की चित्रपट योग्यरित्या तयार झाला आहे तेव्हाच आम्ही हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.
स्प्रिंट आर्ट क्रिएशन प्रा.लि. या बॅनरअंतर्गत तयार झालेल्या 'आघात'ची कथा डॉ. नितीन लवツगारे यांच्या 'निष्कर्ष' या कादंबरीवर आधारित आहे. पार्ले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय साठे, कॅमल कंपनीचे संचालक श्रीराम दांडेडेकर आणि मोहन दामले या त्रयीने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजेश दामले या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून निर्मिती व्यवस्था प्रवीण वानखेडे यांची आहे. पटकथा संवाद समीर विध्वंस यांचे सून प्रविण दवणे यांच्या गीताला संगीतकार श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केले आहे.चित्रपटात विक्रम गोखले यांच्याबरोबर मुक्ता बर्वे, डॉ.अमोल कोल्हे, अनिकेत विश्वासराव, कादंबरी कदम, सुहास जोशी, अनंत जोग, अरूण नलावडे, सुरेखा कुडची, शशांक शिंदे, विद्याधर जोशी, विजय केंकरे, नंदिनी जोग, माधव अभ्यंकर आणि दिपा श्रीराम यांच्या प्रमुख भुमिका आहेत. बॉलिवूडचा अभिनेता किरणकुमार यांनीही लक्ष्यवेधी भुमिका साकारली आहे.