Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

होमियोपॅथीवर जगातील पहिला चित्रपट मराठीत

होमियोपॅथीवर जगातील पहिला चित्रपट मराठीत

चंद्रकांत शिंदे

, मंगळवार, 25 मे 2010 (15:10 IST)
होमियोपॅथीने आजवर हजारो रुग्णांना बरे केले असले तरीही होमियोपॅथीला शास्त्र म्हणून आजही मान्यता दिली जात नाही. होमियोपॅथीमध्ये जवळ-जवळ प्रत्येक आजारावर औषध आहे परंतु त्याचा म्हणावा तसा प्रचार केला जात नाही. ही खंत दूर करण्यासाठीच स्वतः होमियोपॅथीचे डॉक्टर असलेले आणि आशिया खंडातील पहिले होमियोपॅथीचे इस्पितळ उभारणारे डॉ. अमरसिंह निकम यांनी 'प्रतिसाद' नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

होमियोपॅथीवर आधारित हा जगातील पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट आहे. हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्वासमध्ये डॉक्टरची भूमिका उत्कृष्टरित्या साकारणारे संदीप कुलकर्णी यात पुन्हा एकदा डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'वेबदुनिया'शी बोलताना डॉ. निकम यांनी सांगितले, की होमियोपॅथीचा डॉक्टर म्हणून काम करताना मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. होमियोपॅथीमध्ये जवळ-जवळ प्रत्येक आजारावर औषध आहे. मात्र ते रुग्णाच्या प्रतिसादावर अवलंबून असते. मला माझ्या आयुष्यात ज्या समस्यांना तोंड द्यावे लागले त्यावर आधारित हा चित्रपट आहे. मात्र चित्रपट बनवताना आम्ही तो लघुपट वा माहितीपट न होता मनोरंजनाच्या माध्यमातून होमियोपॅथीची ताकद दाखवणारा कसा होईल याकडे लक्ष दिले आहे.

श्वासनंतर पुन्हा या चित्रपटात डॉक्टरची भूमिका साकारणारा संदीप कुलकर्णी म्हणाला, की मला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा आणखी एका डॉक्टराची भूमिका म्हणून मी सुरुवातीला नाही म्हटले. श्वासनंतर माझ्यावर डॉक्टरच्या भूमिकांचा पाउस पडला. परंतु, मी जाणूनबुजून मी त्यापासून दूर राहिलो. कारण मला टाइपकास्ट व्हायचे नव्हते. मात्र प्रतिसादची कथा ऐकल्यावर मी लगेच पुन्हा एकदा डॉक्टरची भूमिका साकारण्यास तयार झालो. हा चित्रपटही उत्कृष्टरित्या तयार झालेला आहे आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मनोरंजनाच्यामाध्यमातून आम्ही होमियोपॅथीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi