Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मालिका गमावली अन् प्रतिष्ठाही

मालिका गमावली अन् प्रतिष्ठाही
कटक , मंगळवार, 6 ऑक्टोबर 2015 (12:09 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा सलग दुसरा पराभव पाहण्याचे धैर्य नसलेल्या क्रिकेटप्रेमींनी सोमवारी ‘मिसाईल्स’ मैदानावर फेकत (पाण्याच्या बाटल्या) नाराजीला वाट करून दिली. भारताच्या सर्वबाद 92 धावा झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 17.1 षटकात 4 बाद 96 धावा करत दुसरा टेंटी-20 सामना जिंकत मालिका खिशात घातली. भारताने मालिका गमावली आणि प्रेक्षकांच्या बाटलफेकीमुळे प्रतिष्ठाही गमावली.
 
11 व्या षटकानंतर थांबलेला सामना सुरू करण्यात यश मिळविल्यानंतर दोनच षटकानंतर पुन्हा बाटलंचा मारा सुरू झाला व मालिका गमवणार्‍या भारताला प्रेक्षकांच्या या ‘शर्मनाक’ कृत्याचा सामना करावा लागला. अकराव्या षटकानंतर सामना थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 9 षटकात 29 धावा हव्या होत्या. 13 व्या षटकानंतर सामना थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 3 बाद 77 धावा होत्या व त्यांना विजयासाठी 23 धावा हव्या होत्या. 
 
द. आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सने १९, डिफाफ डू प्लेसिसने १६, जे पी ड्युमिनीने नाबाद ३० करून भारताने दिलेले ९३ धावांचे आव्हान १७.१ षटकांत ४ बाद ९६ धावा करीत पूर्ण केले.
 
तत्पूर्वी, भारतीय संघाकडून रोहित शर्मा २२, शिखर धवन ११, सुरेश रैना २२, आर. आश्विन ११ हेच फक्त दुहेरी धावसंख्या गाठू शकले. अ‍ॅल्बी मॉर्केलने ४ षटकांत १२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. लेगस्पिनर इम्रान ताहिरने चार षटकांत २४ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. मॉर्केलने कर्णधार महेंद्रसिंह धोनी (५), अक्षर पटेल (९) आणि भुवनेश्वर कुमार (०) यांना माघारी परतवले. ताहिरने रैना (२२), हरभजनसिंगला (०) एकापाठोपाठ माघारी परतवले. मॉरिसने २.२ षटकांत १६ धावांच्या मोबदल्यात शिखर धवन (११) आणि रविचंद्रन आश्विन यांना बाद केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi