UAE मध्ये सुरु असलेल्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत सोमवारी भारताने अफगाणिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतील तीन सामन्यांमधला भारताचा हा दुसरा विजय असून यासह त्यांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. भारताने पहिल्या सामन्यात UAE चा 154 धावांनी पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात त्यांना पाकिस्तानकडून दोन विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. तीन सामन्यांनंतर अ गटात भारताचे आता ६ गुण झाले आहेत आणि उपांत्य फेरीसाठी ते आरामात पात्र ठरले आहेत.
अफगाणिस्तानने दिलेले 260 धावांचे लक्ष्य भारताने 48.2 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून हरनूर सिंगने 74 चेंडूत नऊ चौकारांच्या मदतीने 65 धावा केल्या, राज बावाने 55 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने नाबाद 43 धावा केल्या आणि कर्णधार यश धुलने 26 धावा केल्या. त्यांच्याशिवाय अ रघुवंशी याने 47 चेंडूंत पाच चौकारांसह नाबाद 35, शेख रशीदने सहा, आराध्या यादवने 12 आणि कौशल तांबेने 29 चेंडूंत 4 चौकारांसह नाबाद 35 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नूर अहमदने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.