Akash Deep India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाज आकाश दीपची जोरदार चर्चा झाली. आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात आकाश दीपने जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. पदार्पणाच्या कसोटीत आकाश दीपने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध अवघ्या 6 षटकांत 3 बळी घेतले. आपल्या गजबच्या गोलंदाजीने आकाश दीपने पहिल्या सत्रात इंग्लंड संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याचवेळी आकाश दीपचा इथपर्यंतचा प्रवास सर्वांना वाटतो तितका सोपा नव्हता. आज आम्ही तुम्हाला आकाश दीपच्या संघर्षाने भरलेल्या आयुष्याविषयी काही गोष्टी सांगत आहोत ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
आईसाठी 3 वर्षे क्रिकेट सोडले
आकाश दीपचा टीम इंडियासाठी पदार्पणाचा प्रवास इतका सोपा नव्हता. आकाश दीपने लहान वयातच वडील आणि मोठा भाऊ गमावला. आकाश दीपच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दोन महिन्यांनी त्याचा मोठा भाऊही मरण पावला. मग आकाश दीपची पूर्ण काळजी त्याच्या आईने घेतली. या काळात त्यांच्या घरात पैशांसंबंधी अनेक समस्या होत्या. त्यानंतर आकाश दीपने आईची काळजी घेण्यासाठी 3 वर्ष क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी आकाश दीपने घरखर्च भागवण्यासाठी काही काम करून पैसे कमवले.
आकाश दीपची क्रिकेटची आवड पाहून त्याच्या काकांनी आकाशला खूप साथ दिली. त्यानंतर आकाश दीपला स्थानिक क्रिकेट अकादमीमध्ये दाखल करण्यात आले. काही दिवसाने आकाश बिहारहून कोलकात्यात आला. 2023 मध्ये, आकाश दीपने बंगाल अंडर-23 संघात पदार्पण केले.
यानंतर तो बराच काळ बंगालकडून क्रिकेट खेळला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2022 मध्ये आकाश दीपचा त्यांच्या संघात समावेश केला. आता 23 फेब्रुवारी रोजी आकाश दीपने टीम इंडियासाठी कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा आकाश दीप हा 313 वा खेळाडू ठरला आहे.
आकाश दीपची आई पदार्पणाच्या सामन्यात पोहोचली
आकाश दीपला इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आकाशला पदार्पणाची कॅप दिली. यावेळी आकाश दीपची आईही मैदानावर हजर होती. हा क्षणही सर्वांना भावूक करून गेला.