देशाचा नागरिक म्हणून सुप्रीम कोर्टाचा निर्णय मला पूर्णपणे मान्य आहे. कोर्टाच्या निर्णयाचा मी आदर करतो. बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून मी आजवर कोणतीही वैयक्तिक लढाई केलेली नाही. संघटनेच्या स्वायत्ततेसाठी मी लढा देत आलो, अशी प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दिली.
सुप्रीम कोर्टाने अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवले. कोर्टाच्या निर्णयानंतर अनुराग यांनी एका व्हिडिओच्या माध्यामातून कोर्टाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नोंदवली. बीसीसीआय देशातील सर्वोत्तम क्रीडा संघटना असून जगाशी तुलना करता भारतात क्रिकेटच्या खूप चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. बीसीसीआयच्या मदतीने स्थानिक क्रीडा संघटना खूप चांगले काम करत आहेत. माझ्यासाठी ही वैयक्तिक लढाई नव्हती, मी आजवर संघटनेच्या स्वायत्ततेसाठी लढा दिला. पण मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो, असे अनुराग ठाकूर म्हणाले.
लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींची अंमलबाजवणी करण्यास टाळटाळ केल्याने सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला धक्का दिला. अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची पदावरून हकालपट्टी केली.