आशिया चषकासाठी भारतीय संघाची सोमवारी (8 ऑगस्ट) घोषणा होणार आहे. ही स्पर्धा दुबई आणि शारजाह येथे 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत टी-20 स्वरूपात खेळवली जाईल. टीम इंडियामध्ये अनुभवी सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुलसह अनुभवी फलंदाज विराट कोहली पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे.
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती 15 किंवा 17 सदस्यीय संघाची घोषणा करू शकते. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचं कॉम्बिनेशन काय असेल याची थोडीफार कल्पना आशिया चषकाच्या टीमला मिळेल. भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
विराट कोहलीचे पुनरागमन निश्चित आहे. तिसऱ्या क्रमांकावरील त्याच्या जागेला कोणताही धोका नाही. त्याच क्रमाने तो खेळत राहील. कोहलीने आशिया चषकात प्रभावी कामगिरी केली नसली तरी तो विश्वचषक संघात असेल.
दिनेश कार्तिकने अलीकडच्या काळात चांगली कामगिरी करून संघातील आपले स्थान पक्के केले आहे. दीपक हुडा त्याचा पर्याय असेल. आता सलामीवीर आणि यष्टिरक्षक म्हणून इशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यापैकी कोणाची निवड होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दीर्घकाळ दुखापतीशी झुंज देत असलेल्या दीपक चहरची झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे. चहरची आशिया चषकासाठीही निवड होण्याची शक्यता आहे. संघ व्यवस्थापन सध्या रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि अश्विन यांच्यासोबत पुढे जाण्याचा विचार करत आहे.
आशियाई कपसाठी संभाव्य संघ:
खेळाडू (13): रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश कुमार.
बॅकअप फलंदाज: दीपक हुडा/इशान किशन/संजू सॅमसन.
बॅकअप वेगवान गोलंदाज: अर्शदीप सिंग/आवेश खान/दीपक चहर/हर्षल पटेल.
बॅकअप फिरकीपटू: अक्षर पटेल/कुलदीप यादव/रवी बिश्नोई.