कराची: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान शतकांचा नवा विक्रम रचला आहे. आझमने 71 सामने खेळून 11 शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे. या बाबतीत त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला मागे टाकलं आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बाबर आझमने हा पराक्रम केला आहे. आझमने या सामन्यात 115 धावा फटकावल्या. एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचं अकरावे शतक आहे. अवघ्या 71 डावांमध्ये त्याने हा टप्पा गाठला आहे. विराट कोहलीला 11 शतकांचा टप्पा गाठण्यासाठी 82 डाव खेळावे लागले होते. आझमने ती कामगिरी विराटपेक्षा 11 सामने कमी खेळून केली आहे.
श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 7 बाद 305 धावा केल्या. त्यात आझमच्या 115 धावांचा समावेश होता. अवघ्या 105 चेंडूंत त्याने या धावा केल्या. हा सामना पाकिस्तानने 67 धावांनी जिंकला. पाकिस्तान-श्रीलंकेमधील पहिला एकदिवसीय सामना रद्द झाला होता.
सर्वाधिक वेगवान 11 शतके करण्याचा एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रम दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हाशीम आमला याच्या नावावर आहे. त्याने 64 डावांमध्ये 11 शतके झळकावली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचाच क्विंटन डिकॉक हा फलंदाज आहे. त्याने 65 सामन्यांत ही कामगिरी केली आहे. त्याच्यानंतर आता बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद बाबर आझम हा पाकिस्तानी क्रिकेट संघाचा उपकर्णधार आहे.
19 वर्षांखालील संघामध्ये उत्तम कामगिरीच्या जोरावर त्याने पाकिस्तानी संघात प्रवेश मिळवला होता. सध्या तो पाकिस्तानचा आधारस्तंभ बनला आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे. तो स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली, केन विल्यमसन व ज्यो रूट यांच्या तोडीचा फलंदाज मानला जातो. टी-20 मध्ये या सर्व खेळाडूंपेक्षा त्याची धावांची सरासरी अधिक आहे. तर, एकदिवसीय सामन्यांमध्ये सरासरीच्या बाबतीत तो या चौघांपैकी फक्त कोहलीच्या मागे आहे.