ऑस्ट्रेलियाविरुद्ध या आठवडाअखेर सुरू होत असलेल्या टी-20 मालिकेसाठी अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आश्चर्यकारकरीत्या पुनरागमन केले आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या प्रतिथयश फिरकी गोलंदाजांना मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पुन्हा एकदा वगळण्याचा निर्णयही नव्या युगाची नांदी झाल्याचे दाखवून देणारा ठरला आहे.
येत्या 7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यापासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी राष्ट्रीय निवड समितीने आज भारतीय संघाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत सलग चार अर्धशतके झळकावणाऱ्या अजिंक्य रहाणेला वगळून निवड समितीने आणखी एक धक्का दिला आहे. आजारी पत्नीच्या शुश्रूषेसाठी एकदिवसीय मालिकेतून सुटी घेतलेला सलामीवीर शिखर धवननेही टी-20 मालिकेसाठी संघात कम बॅक केले आहे.
प्रामुख्याने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करीत असलेल्या उमेश यादव व महंमद शमी यांनाही बाजूला ठेवण्यात आले असून गुणवान यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या ऐवजी अनुभवी आणि सध्या फॉर्ममध्ये असलेल्या दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंड अ संघाविरुद्ध पाच प्रथमश्रेणी सामन्यांच्या मालिकेत ऋषभ पंतने आपली कामगिरी सिद्ध करावी अशी निवड समितीची अपेक्षा आहे.
तब्बल 38 वर्षे वयाच्या आशिष नेहराची निवड अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे. परंतु प्रचंड अनुभव आणि युवा खेळाडूंना त्याच्याकडून मिळणारे बहुमोल मार्गदर्शन यामुळे भारतीय ड्रेसिंग रूममध्ये नेहराला मोठा मान आहे. नेहराने आतापर्यंत 25 टी-20 सामन्यांत सहभाग घेतला असून 34 बळी घेतले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण टी-20 मालिकेत नेहरा खेळला होता. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही त्याचा सहभाग निश्चित होता. परंतु दुखापतीमुळे त्याला बाजूला राहावे लागले. श्रीलंका आणि वेस्ट इंडीजविरुद्धचे सामने बिनमहत्त्वाचे असल्याने त्याला खेळविण्यात आले नव्हते, असे निवड समितीच्या सूत्रांनी सांगितले.
भारताचा टी-20 संघ-
भारत- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चाहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा व दिनेश कार्तिक.