इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूटचा आनंद आता द्विगुणित झाला आहे. कारण कोरोना महामारीमुळे तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे तो दुसर्यांदा पिता बनला असून त्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
रूटने इंस्टाग्रावर आपल्या चिमुकल्या मुलीचे छायाचित्र पोस्ट करून ही माहिती क्रिकेटप्रेमींना दिली आहे. रूटची पत्नी कॅरी कॉट्रेल हिने 7 जुलैला मुलीला जन्म दिला होता. या जोडीला यापूर्वीच एक मुलगा (अल्फ्रेड विलियम) असून त्याचे वय तीन वर्षे इतके आहे. विंडीजविरूध्दच्या पहिल्या कसोटीच्या आसपासच्या तारखेलाच त्याची पत्नी प्रसूत होणार होती. त्यामुळे रूटने इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे पहिल्या कसोटी सामन्यासाठी अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती.
रूटच्या अनुपस्थितीत बेन स्टोक्स या कसोटीत इंग्लंडचे नेतृत्व सांभाळत आहे. दुसर्या कसोटी सामन्यात रूट इंग्लंड संघात सामील होणार आहे.