Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराट कोहलीवर गावस्कर संतापले

विराट कोहलीवर गावस्कर संतापले
मुंबई- भारतीय संघाने मोहाली कसोटीत चौथ्याच दिवशी ८ विकेट्सने विजय प्राप्त केला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण संघाने विजयाचा आनंद देखील व्यक्त केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. पण विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 
मोहाली कसोटीत देखील विराट आक्रमक रुपात दिसला. कसोटीच्या दुसऱया दिवशी बेन स्टोक्स बाद झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना कोहलीने स्टोक्सला उद्देशून खोचक टीप्पणी केली होती. विराटच्या या कृतीवर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केला.
 
क्रिकेट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार विराटची कृती दुर्देवी असल्याचे मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. सुनील गावस्कर म्हणाले की, विराटने काहीही म्हटलेले असू दे, प्रश्न तो नाही. पण एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर तो माघारी परतत असताना तुम्हाला टीप्पणी करण्याची गरजच काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रतिस्पर्धी संघाची विकेट पडली की गोलंदाज आणि खेळाडूंचे कौतुक करून त्यांच्यासोबत आनंद व्यक्त करावा. बाद झालेल्या फलंदाजाला काही बोलणे योग्य नाही, असेही गावस्कर म्हणाले. बाद झालेला फलंदाज आधीच नाराज असतो, त्यात आणखी जखमेवर मीठ चोळण्याचे काम का करावे? असा टोला देखील गावस्कर यांनी लगावला.
 
कोहलीने बेन स्टोक्सवर टीप्पणी केल्यानंतर पुढच्या डावात विराट कोहलीला बाद केल्यानंतर बेन स्टोक्स यानेही आपल्या तोंडावर हात ठेवून निषेधात्मक टोला लगावला होता. एकमेकांवर टीप्पणी करण्याचे हे प्रकरण येथेच थांबले नाही. विराट कोहलीनेही स्टोक्स बाद झाल्यावर तोंडावर बोट ठेवून स्टोक्सच्या विकेटचे सेलिब्रेशन केले होते.
 
विराट कोहली याआधीही त्याच्या आक्रमकतेबद्दल टीकाकारांच्या कोंडीत सापडला आहे. कोहलीने मैदानात शांत राहण्याची गरज असल्याचा सल्ला देखील माजी क्रिकेटपटू देत आले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिन्याला देशी दारूच्या फक्त 2 बाटल्या बाळगता येणार