ग्वाल्हेरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा सामना सात गडी राखून जिंकला. बांगलादेशने 128 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने 11.5 षटकांत पूर्ण केले. हार्दिक पांड्याने 16 चेंडूत 39 धावांची नाबाद खेळी केली.
त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार मारले. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 243.75 होता. हार्दिकने 12व्या षटकात तस्किन अहमदच्या पाचव्या चेंडूवर षटकार खेचून सामना पूर्ण केला. या षटकारासह हार्दिकने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक वेळा षटकार मारून सामना संपवणारा तो भारतीय खेळाडू ठरला आहे.
हार्दिकने एकूण पाच षटकार मारून भारताचा सामना संपवला. यापूर्वी हा विक्रम विराटच्या नावावर होता. असे त्याने चार वेळा केले. महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत यांनी भारतासाठी प्रत्येकी तीनदा अशी कामगिरी केली आहे. तर शिवम दुबे, श्रेयस अय्यर, युवराज सिंग, दिनेश कार्तिक, वॉशिंग्टन सुंदर, इरफान पठाण, सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी एकदा अशी कामगिरी केली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पुढील टी-20 सामना 9 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे.