Ind vs Pak :आशिया चषकात सुपर फोरच्या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुलच्या शतकांच्या जोरावर भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी 357 धावांचं विक्रमी लक्ष्य ठेवलं आहे. भारतानं निर्धारीत पन्नास षटकांत 2 बाद 356 धावा केल्या.
पाकिस्तानविरोधात भारताच्या सर्वोत्तम वन डे स्कोरची टीम इंडियानं आज बरोबरी साधली. याआधी 2005 साली भारतानं पाकिस्तानविरोधात 356 धावा केल्या होत्या.
खरंतर कोलंबोतला हा सामना रविवारी (10 सप्टेंबर 2023) सुरू झाला होता पण पावसानं व्यत्यय आणल्यानं तो रिझर्व्ह्ड डेला सोमवारी पुढे खेळवण्यात येतो आहे.
त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली की कोलंबोत मान्सूननं पाऊस जास्त पडला की विराट आणि राहुलच्या वादळी खेळीनं पाडलेला धावांचा पाऊस मोठा होता?
विराट आणि राहुलचा झंझावात
विराटनं आपल्या नाबाद खेळीदरम्यान 94 चेंडूंमध्ये 122 धावा केल्या. त्यानं 9 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
विराटचं हे वन डे कारकीर्दीतलं 47 वं शतक आहे. वन डे क्रिकेटमध्ये आता विराटच्या खात्यात 13 हजार धावा जमा झाल्या आहेत.
तर केएल राहुलनं 106 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 111 धावा केल्या आणि आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलं. वन डे क्रिकेटमध्ये राहुलचं हे सहावं शतक ठरलं.
दुखापतीमुळे मे महिन्यापासून मैदानाबाहेर असलेल्या राहुलचा काही दिवसांपूर्वीच भारताच्या विश्वचषकासाठीच्या संघात समावेश झाला होता, ज्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या.
त्यामुळे राहुलवर आपला फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करण्याचा दबाव होता. पण राहुलनं विराटसोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 233 धावांची भागीदारी रचून जणू सगळ्या शंका दूर केल्या आहेत.
तसंच भारतीय फलंदाजीला साखळी फेरीच्या रद्द झालेल्या सामन्यात धक्के देणारा पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचाही राहुलनं समाचार घेतला.
रोहित आणि शुभमननं रचला पाया
त्याआधी रविवारी पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकं ठोकली.
रोहित शर्मानं 49 चेंडूंमध्ये 56 धावांची खेळी करत वन डे कारकीर्दीतलं 50 वं अर्धशतक साजरं केलं. तर शुभमन गिलनं 52 चेंडूंमध्ये 58 धावांची खेळी केली.
शुभमन गिलच्या फॉर्मवरही काहींनी टीका केली होती. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला होता. पण सुपर फोरच्या लढतीत त्यानं सगळी कसर भरून काढली.
रविवारी सामना पावसामुळे थांबवला तेव्हा भारतानं 24.1 षटकांत दोन बाद 147 धावा केल्या होत्या. सोमवारीही पावसामुळे खेळ वेळेत सुरू झाला नाही.
मैदान वाळवल्यावर ओव्हरमध्ये कमी न करता सामना सुरू झाला, भारतीय वेळेनुसार 4.40 वाजता सामना सुरू झाला.
Published By- Priya Dixit