IND vs WI:भारतीय घातक फिरकी जोडी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रंगत आणली. या जोडीच्या नावावर आता लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये 500 विकेट्स झाल्या आहेत. क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये अशी कामगिरी करणारी अश्विन-जडेजा जोडी भारताची दुसरी आणि एकूण 12वी जोडी ठरली आहे. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी या दोघांनी आणखी दोन विकेट्स घेतल्यास अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग या जोडीला सोडून ते भारताची नंबर-1 जोडी बनतील.
सध्या अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग ही विकेट्सच्या बाबतीत भारताची सर्वात यशस्वी जोडी आहे. या दोघांनी एकत्र खेळलेल्या 54 सामन्यांमध्ये एकूण 501 कसोटी विकेट घेतल्या आहेत. कुंबळेच्या नावावर 281 तर भज्जीच्या नावावर 220 होते.
दुसरीकडे, अश्विन आणि जडेजा यांच्या जोडीबद्दल बोलायचे झाले तर या दोघांनी मिळून 49 सामने खेळून या 500 विकेट्स घेतल्या. यातील 274 विकेट अश्विनच्या आहेत तर 226 विकेट रवींद्र जडेजाच्या आहेत. या जोडीला आता भारताची नंबर-1 जोडी बनण्यासाठी दोन विकेट्सची गरज आहे.
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीबद्दल बोलायचे झाल्यास, चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमानांनी 365 धावांचे आव्हान असताना 2 गडी गमावून 76 धावा केल्या आहेत. विंडीज सध्या विजयापासून 289 धावा दूर आहे, तर भारताला विजयासाठी 8 विकेट्सची गरज आहे.