Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इशान किशन : 200 धावांनंतरही डच्चू, का होतेय करुण नायरशी तुलना

इशान किशन : 200 धावांनंतरही डच्चू, का होतेय करुण नायरशी तुलना
, मंगळवार, 10 जानेवारी 2023 (19:07 IST)
भारत आणि श्रीलंका यांच्यात गुवाहाटी इथे पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार रोहित शर्माने सलामीला माझ्यासह शुबमन गिल येईल हे स्पष्ट केलं. रोहित-शुबमन जोडी सलामीला येणार कळताच इशान किशनची करुण नायरशी तुलना होऊ लागली. काय आहे नेमकं प्रकरण समजून घेऊया.
 
भारताने शेवटची वनडे 10 डिसेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध चत्तोग्राम खेळली होती. या लढतीत सलामीवीर इशान किशनने 24 चौकार आणि 10 षटकारांसह 210 धावांची अद्भुत खेळी साकारली होती. वनडेत द्विशतक झळकावणारा इशान केवळ चौथा भारतीय आणि 7 वा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला होता. या खेळीसह इशानने अनेक विक्रम मोडीत काढले होते. वनडेत द्विशतक हा दुर्मीळ विक्रम आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत जलद द्विशतक करण्याचा विक्रम इशाननं आपल्या नावावर केला होता.
 
तंत्रकौशल्य, सातत्य आणि फिटनेस अशा सगळ्या आघाड्यांवर कणखर असलेले खेळाडूच या विक्रमापर्यंत पोहोचले आहेत. इशानआधी वनडेत भारताकडून द्विशतक झळकावलेल्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा या दिग्गजांचा समावेश होतो.
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या तिघांव्यतिरिक्त ख्रिस गेल,मार्टिन गप्तील,फखर झमन यांच्या नावावर द्विशतक आहे. वनडे क्रिकेटमधलं हे दहावं वैयक्तिक द्विशतक आहे. द्विशतकी खेळी केल्यानंतर खेळाडूचं संघातलं स्थान पक्कं होण्याचीच शक्यता पण इशानच्या बाबतीत तसं झालेलं नाही. महिनाभरानंतर भारतीय संघ वनडेत खेळायला उतरणार आहे. पण या वनडेत इशान भारताचा सलामीवीर नसेल. त्याच्याऐवजी शुबमन गिल कर्णधार रोहित शर्माच्या बरोबरीने सलामीला येईल. कर्णधार रोहित शर्माने पूर्वसंध्येला सांगितल्याप्रमाणे इशान संघातही असणार नाहीये. महिनाभरापूर्वीच्या लढतीत रोहित शर्मा आणि शुबमन गिल संघाचा भाग नव्हते. यामुळे शिखर धवन आणि इशान किशन सलामीला आले होते.
 
इशानने या संधीचं सोनं करत द्विशतक झळकावलं. पण द्विशतक झळकावूनही इशानला संघात स्थान मिळणं अवघड झालं आहे. रोहित-गिल या सलामीवीरांच्या बरोबरीने विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल.राहुल हे संघात असतील.

करुण नायर कनेक्शन?
द्विशतक झळकावूनही इशानच्या नशिबी पुढच्या सामन्यातून डच्चू येणार आहे. असंच काहीसं करुण नायरच्या बाबतीत 7 वर्षांपूर्वी टेस्टमध्ये घडलं होतं.
 
करुणने 2016 मध्ये चेन्नई इथे इंग्लडविरुद्ध खेळताना नाबाद 303 धावांची त्रिशतकी खेळी साकारली होती. करुणने 32 चौकार आणि 4 षटकारांसह ही खेळी सजवली होती.
 
त्रिशतक हा अतिशयच दुर्मीळ विक्रम मानला जातो. धावांची प्रचंड भूक, उत्तम तंत्रकौशल्य आणि फिटनेस हे सगळं जुळून आलं तरच त्रिशतक होतं. करुणने टेस्टमधलं पहिलं शतक झळकावलं तेच मुळी त्रिशतक होतं. त्रिशतकानंतर करुणवर कौतुकाचा वर्षाव झाला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाच्या या विश्वासू साथीदाराने निवडसमितीचा विश्वास सार्थ ठरवला होता.
 
वीरेंद्र सेहवागनंतर भारताचा केवळ दुसराच त्रिशतकवीर होण्याचा मान करुणला मिळाला. त्रिशतकामुळे करुण टेस्ट संघात पक्का असंच चाहत्यांना वाटलं. पण तसं झालं नाही. भारतीय संघाने पुढच्या टेस्टमध्ये करुणला वगळलं. त्यावेळी संघव्यवस्थापनावर टीका झाली होती. तीनशेपल्याड धावा करुनही पुरत नसतील तर एखादा बॅट्समन आणखी काय करणार? असा सवाल केला होता.
 
काही सामन्यांनंतर करुणला संघात स्थान मिळालं पण तो मोठी खेळी करू शकला नाही. त्रिशतकानंतर करुण अवघ्या तीन टेस्ट खेळला. कामगिरीत सातत्य नसल्याने त्याला वगळण्यात आलं.
 
इशानचं वय जमेची बाजू
इशानचं वय ही त्याच्यासाठी जमेची बाजू आहे. इशान 24 वर्षांचा आहे. 24व्या वर्षीच त्याने 10 वनडे आणि 24 ट्वनेटी20 लढतीत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तडाखेबंद फलंदाजी आणि उत्तम विकेटकीपिंग ही त्याची ओळख आहे. डोमेस्टिक पातळीवरील स्पर्धांमध्ये तसंच आयपीएल स्पर्धेत इशानच्या बॅटचा तडाखा असंख्य गोलंदाजांनी अनुभवला आहे.
 
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने इशानच्या कौशल्यावर प्रचंड विश्वास दाखवत गेल्या वर्षी झालेल्या लिलावात तब्बल 15.25 कोटी रुपये खर्चून त्याला ताफ्यात समाविष्ट केलं होतं. 24व्या वर्षी इशानच्या नावावर आयपीएल स्पर्धेत 75 सामन्यात 132.34च्या स्ट्राईकरेटने 1870 धावा आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर शतक नसलं तरी 12 अर्धशतकं त्याने झळकावली आहेत. बॅटिंगच्या बरोबरीने इशानने विकेटकीपिंगची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.
 
वय आणि खेळ पाहता इशानचा करुण नायर होण्याची शक्यता कमी आहे. पण द्विशतक झळकावल्यानंतर पुढच्या लढतीत संघाबाहेर बसण्याची वेळ आल्याने चाहत्यांना लगेचच करुण नायरची आठवण झाली. त्रिशतक झळकावलं त्यावेळी करुणचं वय होतं 25. करुणकडूनही चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. भारतीय संघाला मधल्या फळीत एक चांगला फलंदाज मिळाला अशीच चाहत्यांची धारणा झाली होती. पण करुण संघातलं स्थान राखू शकला नाही.
 
कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला?
"शुबमन आणि इशान दोघांनीही चांगली कामगिरी केली आहे. दोघांची कामगिरी पाहिली तर गिलला पुरेशी संधी देणं आवश्यक आहे. गिल सातत्याने धावा करतो आहे. इशानही उत्तम खेळतो आहे. शेवटच्या वनडेत तर त्याने द्विशतकी खेळी केली होती. द्विशतक झळकावणं किती कठीण आहे हे मी माझ्या उदाहरणातून नक्कीच समजू शकतो. हे खूपच मोठं यश आहे.
 
इशान अंतिम अकरात नसणं दुर्देवी आहे पण गेल्या आठ ते नऊ महिन्यात संघाची जशी वाटचाल झाली आहे, वनडेत जशी संघाने आगेकूच केली आहे गिलला संधी देणं आवश्यक आहे. त्याने सातत्याने धावा केल्या आहेत. इशानला संघात जागा न मिळणं निराशाजनक आहे पण तो आमच्या योजनांचा भाग असेल", असं भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार धोक्यात येणार?