Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘कुणी काम देतं का काम’,क्रिकेटपटू विनोंद कांबळी

‘कुणी काम देतं का काम’,क्रिकेटपटू विनोंद कांबळी
, बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (21:39 IST)
मराठीतील श्रेष्ठ नाटककार कुसुमाग्रज यांच्या नटसम्राट नाटकांमध्ये आप्पासाहेब बेलवलकर यांच्या तोंडी एक प्रसिद्ध वाक्य आहे, ‘कुणी घर देतं का घर?’.. अशाच प्रकारची वेळ आहे का माजी क्रिकेटपटू वर आली आहे, ‘मला कोणी काम देतं का काम?’असे तो सध्या म्हणत आहे. हा क्रिकेटपटू आहे विनोद कांबळी
 
मुंबईच्या मातीतून आतापर्यंत देशाला अनेक प्रतिभावंत क्रिकेटपटू मिळाले आहेत. अशा क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या जोडीचा समावेश होतो. मात्र, सचिनला ज्याप्रमाणात यश आणि प्रसिद्धी मिळाली तशी प्रसिद्धी विनोदला मिळाली नाही.कधीकाळी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना ‘सळो की पळो’करून सोडणारा विनोद कांबळी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. असे असले तरी त्याला सचिनसारख्या प्रसिद्ध आणि यशस्वी मित्राकडून मदतीची अपेक्षा नाही, असे तो म्हणतो.
 
सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मिळणारे 30 हजार रुपये निवृत्ती वेतन हा कांबळीच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत आहे. “मी एक निवृत्त क्रिकेटपटू आहे. मी सध्या पूर्णपणे बीसीसीआयच्या निवृत्तीवेतनावर अवलंबून आहे. त्यासाठी मी खरोखर मंडळाचा आभारी आणि कृतज्ञ आहे. निवृत्तीवेतनामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य होत आहे,”असे कांबळीने मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
 
आपण सचिन तेंडुलकरकडून मदत का नाही घेत, याबाबद्दल कांबळी म्हणाला की, “सचिनला सर्व काही माहित आहे. पण, मला त्याच्याकडून कशाचीही अपेक्षा नाही. त्याने मला तेंडुलकर अॅकॅडमीमध्ये काम दिले होते. मला तेव्हा खूप आनंद झाला होता. तो खूप चांगला मित्र आहे. तो नेहमीच माझ्यासाठी उपलब्ध असतो. शाळेत असल्यापासून त्याने माझी मदत केली.”
 
“मला कामाची गरज आहे. मी तरुणांसोबत काम करायला तयार आहे. मुंबईने अमोल मुझुमदार यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले आहे. पण, गरज भासली तर मला संधी द्यावी. मला मुंबईच्या संघासोबत काम मिळावे, अशी माझी इच्छा आहे. माझ्या मागे माझे कुटुंब आहे, त्यामुळे काम करणे गरजेचे आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मला काहीतरी काम द्यावे”,असे विनोद कांबळी म्हणाला.
 
कांबळीने यापूर्वी प्रशिक्षकाचे काम केलेले आहे. 2019 मध्ये, त्याने मुंबई टी20 लीगमध्ये एका संघाला प्रशिक्षण दिले होते. याशिवाय, तो तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीचा भाग होता. तिथे त्याने नवख्या क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले. आपल्या पहिल्या सात कसोटींमध्ये 793 धावा आणि 113चा स्ट्राईक रेट अशी त्याची धुवाँधार फलंदाजी सुरू होती. 224 आणि 227त्याची त्या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी होती. पण नंतर काही कारणास्तव विनोद कांबळी संघातून बाहेर झाला आणि त्याला नंतर फारशी संधी मिळालीच नाही. या साऱ्या गोंधळानंतर विनोद कांबळी विविध मुद्द्यांमुळे चर्चेत आला होता.
 
आता मात्र तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय. विनोद कांबळी हा सध्या कामाच्या शोधात आहे. त्याची आर्थिक परिस्थिती पाहता तो आता नोकरी शोधतोय असं त्याने मिडडेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. मला काम हवंय, माझं घर चालवायचंय…”; टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळीची विनवणी सर्वांचे मन हेलावून टाकणारी आहे.
 
कांबळी म्हणाला की, मला आता कामाची गरज आहे. मी क्रिकेट इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये गेलो होतो पण तो मानद जॉब होता. मला पगाराची म्हणजे पैशाची गरज होती. कारण माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला अनेकदा सांगितलं की जेव्हा माझी गरज भासेल तेव्हा तुम्ही मला बोलवा. मी सेवा देण्यास तयार आहे. वानखेडे असो किंवा बीकेसी ग्राऊंड असो, मला काम करायला नक्कीच आवडेल. कारण मुंबई क्रिकेटने मला खूप काही दिलंय. त्यामुळे आता माझी परतफेड करण्याची वेळ आहे”,असेही कांबळी म्हणाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाप्परे, गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून १२ वर्षाच्या मुलाची आत्महत्या